Indian Street Premier League (ISPL) ही स्टेडियममध्ये खेळली जाणारी हिंदुस्थानातील पहिली-वहिली टेनिसबॉल T10 क्रिकेटस्पर्धा आहे. या स्पर्धेचा दुसरा सीझन 26 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमध्ये होणार आहे.
देशभरातील इच्छुक क्रिकेटपटू आता पाच स्पर्धात्मक झोनमध्ये विभागलेल्या 55 शहरांमध्ये चाचण्यांसाठी नोंदणी करू शकतात. नवीन खेळाडूंसाठी ही मोठी संधी आहे. प्रत्येक शहरात झालेल्या चाचणी प्रक्रियेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची विभागस्तरावर निवड होईल. विभागीय पातळीवर सर्वोत्तम कामगिरी करणारे अव्वल खेळाडू लिलाव प्रक्रियेमध्ये पोहोचतील. प्रत्येक झोनसाठी अंतिम चाचण्यांसाठी तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मध्य आणि दक्षिण विभाग 26 ते 28 ऑक्टोबर, पूर्व आणि उत्तर विभाग 2 ते 4 नोव्हेंबर आणि पश्चिम विभाग 5 ते 9 नोव्हेंबर या काळात चाचण्या होणार आहेत. 12 आणि 13 नोव्हेंबर 2024 रोजी सिम्युलेशन सामने होतील.
अमिताभ बच्चन (माझी मुंबई), अक्षय कुमार (श्रीनगर के वीर), हृतिक रोशन (केव्हीएन बंगलोर स्ट्रायकर्स), सैफअली आणि करीना कपूर खान (कोलकाता टायगर्स), रामचरण (फाल्कन रायडर्स हैदराबाद), आणि सुरिया शिवकुमार (चेन्नई सिंगम्स) यांनी अतुलनीय स्टारपॉवर आणली. ज्यामुळे ISPL हा एक प्रीमियर इव्हेंट बनला आहे. त्यामुळे देशभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये याची लोकप्रियता वाढली आहे. सैफ आणि करीना कपूरखान यांच्या मालकीच्या कोलकाता टायगर्सने, माझी मुंबईला अंतिम फेरीत पराभूत करून पहिल्या पर्वाचे विजेतेपद पटकावले होते.
ISPLच्या कोअरकमिटी सदस्य सचिन तेंडुलकर याने यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “ज्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्यासाठी ISPL हे एक व्यासपीठ आहे. या स्पर्धेने नवीन प्रेक्षकांसाठी खेळामध्ये आनंद आणला आणि देशभरातील युवा क्रिकेटपटूंसाठी दरवाजे उघडले आहेत. मला आशा आहे की ही लीग सतत वाढत आहे आणि भारतीय क्रिकेटवर कायमस्वरूपी प्रभाव पाडत राहील, ज्यामुळे प्रत्येक खेळाडूला मोठे स्वप्न पाहण्याची संधी मिळेल.” असे सचित तेंडूलकर म्हणाला.