
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रोजगारावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. विदर्भासारखी नैसर्गिक संपत्ती, बुद्धिमत्ता, श्रम करण्याची ताकद महाराष्ट्रात इतरत्र कुठेच दिसली नाही. हा भाग कायम संघर्ष करत राहिला. पण सुदैवाने म्हणा, दुर्दैवाने म्हणा इकडचे अनेक नेते महाराष्ट्राचे राज्यकर्ते झाले. पश्चिम महाराष्ट्र, मुंबईच्या तोडीचं नेृतत्व उभं करुन विकासाची गंगा आपल्याकडे आणायला पाहिजे, ती आणण्यामध्ये इकडचं नेतृत्व असफल झाल्याचं सांगत संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
आताही राज्याची सत्ता विदर्भाच्याच हातात आहे. आमचे नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते बांधले, पूल बांधले. देवेंद्र फडणवीस अनेक वर्षे सत्तेत आहेत, अनेक महत्वाची खाती या राज्याची विदर्भात आहेत. गेल्या 70 वर्षात विदर्भाकडे अनेकदा मुख्यमंत्री पद आलं, केंद्रात मंत्रीपदं आली.
नितीन गडकरींमुळे आज संपूर्ण विदर्भात रस्त्याचं जाळं उभं राहिलंय. संपूर्ण देश नागपूरशी, विदर्भाशी जोडला गेला. मग त्याच रस्त्यावरुन या विदर्भात उद्योग आला तर नोकऱ्या मिळतील. अमरावती, नागपूरसारख्या शहरांमध्ये आयटी पार्क उभे राहिले असते तर इकडच्या तरुणांना बाहेर जावं लागलं नसतं आणि या भागाचा विकास झपाट्याने झाला असता. विदर्भच नाही तर महाराष्ट्राच्या गतीला आज खोडा पडलेला आहे. भविष्यात हे चित्र बदलायचं असेल तर आपल्याला हे नेतृत्व बदलावं लागेल, असेही संजय राऊत यांनी पुढे म्हटले.
नोकऱ्या करणारे नव्हे देणारे व्हा
आपण नोकऱ्या करणारे नाही नोकऱ्या देणारे व्हायले पाहिजे. ज्या दिवशी या महाराष्ट्रातील मराठी जनता, मराठी उद्योजक नोकऱ्या देणारा होईल तेव्हा हा महाराष्ट्र अधिक प्रगतीपथावर जाईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.