जळकोट तालुक्यात ढगफुटी; हजारो हेक्टरवरील पिकांचं मातेरं, शेतकरी हतबल

जळकोट तालुक्यातील वांरवाडासह 10 गावांमध्ये अतिवृष्टी होऊन हजारो हेक्टरवरील पिकांचे मातेरे झाले आहे. जून महिन्यापासून रक्ताचे पाणी करून पिकवलेली पिकं ढगफुटीसदृश्य पावसामुळे आडवी झाली आहेत. सुपीक जमीनही खरडून वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

सोरगा, होकरणा, उमरदरा, केकतसिंदगी, वडगाव, वांजरवाडा, उमरगा रेतू, शेलदरा, चेरा या गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस होऊन शेतातील उभ्या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. दरवर्षी जुलै-ऑगस्ट महिन्यात जळकोट तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. यंदाही पावसाने झोडपून काढल्याने हाता तोंडाशी आलेली पिके वाहून गेली आहेत. तर उरलीसुरली पिके करपून जात आहेत.