अखेर अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली, जनशक्ती संघटनेच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर जिह्यात वादग्रस्त ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांची अखेर बदली झाली असून, जनशक्ती संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यांच्या जागी यवतमाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे यांची नियुक्ती झाली आहे. संजय माळी यांना अद्यापि कुठलाच पदभार देण्यात आलेला नाही.

करमाळा तालुक्यासह जिह्यातील अनेक ठिकाणी सुरू असलेल्या रस्तेकामांत सोलापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी ठेकेदारांकडून ‘टक्केकारी’ घेतल्यामुळे रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली. शासनाच्या नियम व अटींना अधीन न राहता मर्जीतील ठेकेदारांकडून पैसे घेऊन त्यांना कामे दिली, असा आरोप जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे-पाटील यांनी अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्यावर केले होते. शिवाय संजय माळी यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांच्या एका कार्यकर्त्याला ‘प्रति संजय माळी’ करून तोंडाला काळे फासले होते व गळ्यात नोटांची माळ घातली होती. यावेळी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

दरम्यान, आंदोलन करून शांत न राहता अतुल खुपसे-पाटील यांनी यासंबंधी बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला होता. दरम्यान, वादग्रस्त ठरलेले बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांची बदली झाल्याने जनशक्ती शेतकरी संघटनेसह अनेक ठेकेदारांनी आनंद व्यक्त केला.