मुंबादेवी परिसर लाडक्या कंत्राटदार मित्राच्या घशात घालू देणार नाही, आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला इशारा

मुंबईकरांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबादेवी परिसराचे सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली मिंधे सरकार हा परिसरलाडक्या कंत्राटदारमित्राच्या घशात घालण्याचे कारस्थान करीत आहे. मात्र या प्रस्तावित सुशोभीकरणासाठी मंदिर न्यासाला विश्वासात घ्यावे, परिसरातील शेकडो वर्षे जुन्या व्यावसायिकांचा विचार व्हावा आणि श्रद्धेला कोणताही धक्का लागू नये, अशी मागणी करतानाच मुंबादेवी परिसर मिंध्यांच्या लाडक्या कंत्राटदार मित्राच्या घशात घालू देणार नाही, असा इशारा शिवसेना नेतेयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला.

मुंबादेवी परिसर कॉरिडॉर करण्याच्या नावाखाली कारस्थान करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी मुंबादेवीचे मनोभावे दर्शन घेत, मिंध्यांच्या कारस्थानाचा गौप्यस्फोटही केला. मुंबादेवी परिसरात दोनशे वर्षांपासून व्यवसाय करणारे छोटे-मोठे व्यावसायिक आहेत. यांचा विचार या सुशोभीकरणात करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे मंदिर ट्रस्टलाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तर मंदिराच्या मागच्या बाजूला सतरा मजली पार्किंग, भंगार गाड्या गोडावून बांधण्याचा घाट घातल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मात्र यामुळे मंदिर झाकोळले जाणार आहे. त्यामुळे पार्किंग इमारत बांधण्याचा निर्णय रद्द करावा,  अन्यथा याविरोधात आम्ही लढा उभारू, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.

दोनशे वर्षांचे अर्थचक्र बंद पडण्याचा धोका

मुंबादेवी परिसरात दागिने बाजार, छोटे-मोठे व्यावसायिक गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांपासून पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. मंदिर सुशोभीकरणामध्ये या व्यावसायिकांचे काय करणार याबाबत मिंध्यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. यामुळे शेकडो वर्षांचे हे अर्थचक्र बंद पडण्याचा धोका असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

 नागपूरच्या कंपनीला कंत्राट

मंदिराच्या मागच्या बाजूला बांधण्यात येणाऱ्या 17 मजली इमारतीमुळे मंदिर झाकोळले जाणार आहे. शिवाय ही इमारत बांधण्याचे काम नागपूरच्या कंत्राटदाराला देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. ही कंपनी भाजपशी संबंधित आहे का, असा सवालही त्यांनी केला. शिवाय भंगार गाड्या डंपिंगमुळे डेंग्यू-मलेरियासारखे आजारही बळावतील. एका बाजूला अयोध्या, वाराणसीचे काम ट्रस्टकडून होत असताना हे काम नक्की कुणासाठी केले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.