Nagar News – राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, प्राजक्त तनपुरेंचा ठाम विश्वास

हे सरकार फक्त घोषणाबाज सरकार आहे. पुढच्या योजनांच्या घोषणा करत आहेत. पण मागच्या घोषणांचे काय? निवडणुका डोळ्यापुढे ठेवून फक्त घोषणा केल्या जात आहेत. माझ्या विरोधात कुणीही लढू द्या आपण आपल्या पाच वर्षाच्या कामाशी प्रामाणिक आहोत. हे मतदार संघातील जनतेने पाहिले आहे. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचेच सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे मी आत्मविश्वासाने सांगतो, असा विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.

राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे ब्राह्मणी ते पिंपरी वळण व ब्राह्मणी-वांबोरी या रस्त्याच्या सुमारे चार कोटी छत्तीस लाख रुपयांच्या कामाचे लोकार्पणा प्रसंगी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ हापसे होते. यावेळी पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की, या कामासाठी आपण सण 2022 ला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात सुचवला होता. त्यानंतर सरकार बदलले. पण पुढे गतिमान बनवणाऱ्या या सरकारने कामाच्या मंजुरीला आणि प्रत्यक्षात सुरुवातीला विलंब लावला यासाठी आरडगावात रस्ता रोको केला. त्यानंतर प्रत्यक्षात काम सुरू व्हायला 2024 उजाडला. अशाप्रकारे अनेक सुचवलेल्या कामांना आणि मंजूर कामांना या सरकारने स्थगिती दिली. प्रसंगी कोर्टात जावे लागले. पण जनतेच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण पाठपुरावा केला. तसेच कुठेही न जाता पवार साहेबांबरोबरच आणि तालुक्याच्या जनतेच्या बरोबर राहिलो, असे प्राजक्त तनपुरे म्हणाले.

सध्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हे सरकार घोषणांचा पाऊस पाडत आहेत. लाडक्या बहिणींना 46 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. पण फक्त पाच हजार कोटी रुपये खर्च केले तर दाजींना रात्री अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाण्याची वेळ येणार नाही. दिवसा वीज देता येईल याचा विचार करणे गरजेचे होते. सध्या सर्वत्र बिबट्या आणि वाघांची संख्या वाढलेली असून शेतकऱ्यांना माता-भगिनींना रात्री अपरात्री काम करण्यासाठी आणि पाणी देण्यासाठी जावे लागते. जर दिवसा वीज दिली, तर शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जावे लागणार नाही. येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून त्यात आपण प्राधान्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी उपस्थित नागरिकांना दिला. यावेळी रंगनाथ मोकाटे, डॉक्टर राजेंद्र बानकर, भारत तारडे, प्रशांत शिंदे, यशपाल पवार, वैभव जरे, आबासाहेब लहारे, रोहिदास रंधे, गंगाधर जरे, साईनाथ हापसे, विनायक गोलवड आदींसह ब्राह्मणी, वांबोरी ,पिंपरी वळण, चंडकापूर, केंदळ परिसरातील लाभधारक शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.