>>रविप्रकाश कुलकर्णी
मूळ आणि समकालीन अस्सल साधनांचा आधार घेऊन अठराव्या शतकातील मराठा साम्राज्याचा इतिहास प्रकाशित करण्याचा प्रकल्प मुळा मुठा पब्लिशर्स, पुणे यांच्यातर्फे सुरू झाला असून आता त्यांच्यातर्फे ‘माधवराव पेशवाः विजय आणि व्यथा’ हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. लेखक आहेत उदय स. कुलकर्णी. मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद विजय बापये यांनी केलेला आहे. या विषयाबाबत इंग्रजीत लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी मराठी साधनांचा हवा तसा आणि हवा तेवढा उपयोग केलेला दिसत नाही. बऱ्याचदा मराठी भाषेचे अज्ञान हेदेखील एक कारण आहे. ही समस्या ओळखून लेखक उदय कुलकर्णी यांनी मराठी साधनांचा सखोल अभ्यास करून आधी इंग्रजीत लेखन संदर्भ बहुल केलेले आहे. नंतर त्याचा मराठी अनुवाद विजय बापये यांनी केलेला आहे.
पानिपतच्या लढय़ात मराठय़ांचा दारुण पराभव झाला. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव यांसारखे रणझुंजार कामी आले. या धक्क्याने पाच महिन्यांत श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी देह ठेवला. अशा बिकट परिस्थितीत अवघे सोळा वर्षांचे असलेल्या माधवरावाची पेशवा म्हणून निवड करण्यात आली. वारसाहक्काने ते बरोबरच होते. पण राघोबादादाला वाटत राहिले की, आपली लायकी असतानाही पेशवे म्हणून आपल्याला डावलण्यात आले.
या राक्षसी महत्त्वाकांक्षेतून मराठी सत्तेशी कायम प्रतारणा केली. माधवराव पेशव्यांच्या अस्तनीतला हा निखारा ठरला. अशा घरभेद्याला तोंड देत असताना बाहेर निजामासारखा कावेबाज शत्रूला जशास तसे उत्तर देताना माधवरावांची ससेहोलपट होत होती. त्यात पुन्हा इंग्रज मराठी दौलतीचा घास केव्हा घेता येईल यासाठी टपलेले होतेच. अशाही दुर्धर परिस्थितीत माधवराव पेशव्यांनी कर्नाटक मोहीम यशस्वी करून दाखवली. उत्तरेत महादजी शिंदेना पाठवून दिल्लीवर भगवा फडकवला. पण दुर्दैवाने या वळणावरच माधवरावांना असाध्य असा राजयक्ष्मा-क्षयरोग झाला आणि त्यानेच बळी घेतला. तो दिवस होता 18 नोव्हेंबर 1772. केवळ अकरा वर्षांच्या कारकीर्दीत या पेशव्याने घेतलेली झेप थक्क करणारी आहे. हा सर्व इतिहास लेखक कुलकर्णी यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा संदर्भ घेऊन विवेचन केलेला आहे. पण या ग्रंथातील ज्या टिपा आहेत त्या वैशिष्टय़पूर्ण तर आहेतच. शिवाय त्या काळावर प्रकाश टाकतात.
त्या काळात देशस्थ आणि कोकणस्थ हे भेद पराकोटीला पोहोचले होते. त्या टिपेत पुढे म्हटले आहे की, ‘या जातीत विवाह संबंध होत नसत. 1713 साली पेशव्यांची सद्दी सुरू झाल्यावर राजकारणात कोकणस्थांचं प्राबल्य वाढले. याच काळात नानासाहेब पेशव्यांनी पैठणचे वाखारे या देशस्थाची मुलगी केली. पेशव्याने देशस्थ मुलीशी लग्न करणे ही गोष्ट परंपरेला छेद देणारी होती. दत्तक घेण्याची कल्पना त्या काळात घट्ट रुजली होती. सगोत्रात लग्न निषिद्ध होते. पण दत्तक घेताना सगोत्र असला पाहिजे ही सर्वमान्य रीत होती.’ रघुनाथरावाने हा रिवाज पाळला नाही. आनंदीबाईचाही या दत्तक विधानाला विरोध होता. पण वारस आणून माधवरावला शह देण्याच्या लालसेमुळे रघुनाथरावाने आपला बेत पार पाडला.
सखाराम बापूंची एक आख्यायिका येथे दिलेली आहे. भोसले यांचे वकील बापूस भेटायला गेले असता त्या वेळी बापू बुद्धिबळ खेळत होते. माधवरावच्या कारकूना समक्ष, ‘तुमचा राजा एक घर मागे न्यावा आणि प्यादी एक घर पुढे घ्यावी,’ अशा अर्थाची खेळातली, परंतु गर्भित सूचना त्यांनी केली. भोसल्यांच्या वकिलाने तेवढे ध्यानात ठेवून जानोजी पेशव्यांचे भेटीस न येण्याबाबत व फौज पुढे पाठवण्याबद्दल लिहिले. ही गोष्ट माधवरावास कळताच त्यास एकदम सर्व प्रकाश पडला. अर्थात भोसले यांच्या वकिलाची त्याने चांगलीच कानउघाडणी केली. ही आख्यायिका बापूच्या बुद्धिमत्तेची व त्याची कारस्थाने कशाप्रकारे चालत याचे उदाहरण म्हणून सांगता येईल. 1936 साली यशवंत गोपाळ कानेटकर लिखित सखाराम बापूंचे चरित्रमधून ही आख्यायिका घेतलेली आहे.
ग्रंथामध्ये छत्रपती, पेशवे, होळकर, शिंदे, निजाम, नागपूरकर भोसले, पुरंदरे, मुगल बादशहा आणि पटवर्धन यांच्या वंशावळी सुबकपणे दिलेल्या आहेत.