>>माधव डोळे
जबरदस्त जिद्द आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी असेल तर छोटय़ा गावातील व्यक्ती आपल्या आयुष्यात किती उंचीवर जाऊन पोहोचते याचे उदाहरण म्हणजे ठाणे जिह्यातील शहापूरचे प्रकाश परांजपे. पत्रकारिता, संगीत, वाचन, लेखन, सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांमध्ये काम करीत असतानाच त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष दत्ताजी नलावडे व अरुण गुजराथी यांचे जनसंपर्क अधिकारी इथपर्यंत मजल मारली. हा प्रदीर्घ प्रवास तसा सोपा नव्हता. शहापूर ते थेट विधिमंडळापर्यंतच्या विविध आठवणींचा व घडामोडींचा कोलाज म्हणजे ‘आठवणींचा पासपोर्ट’ हे पुस्तक. यातील आठवणी या व्यक्तिगत असूनही त्या वाचताना त्यातील जाणिवा व अनुभव सार्वत्रिक वाटतात. त्यात महाराष्ट्रातील राजकीय इतिहासाबरोबरच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, बाबासाहेब पुरंदरे, पु.ल. देशपांडे, दि. बा. मोकाशी अशा विविध दिग्गजांच्या सान्निध्यात घालवलेले क्षण पानोपानी टिपले आहेत. एकूणच हे पुस्तक वाचताना राजकारण, संगीत, कला अशा विविध क्षेत्रांतील मुशाफिरींचा अनुभव देतो. एकदा ‘आठवणींचा पासपोर्ट’ मिळाला की, मनाच्या विमानात बसून यथेच्छ कुठेही सैर करता येते. लेखक प्रकाश परांजपे यांनी अतिशय मनमोकळेपणाने आपल्या आयुष्याचा हा प्रवास ‘पासपोर्ट’च्या आधारे केल्याचे दिसून येते.
शहापूरसारख्या गावातील एक मुलगा थेट मुंबईत येऊन धडकतो आणि मुंबई महापालिकेत चिटणीस कार्यालयात स्टेनोग्राफर म्हणून नोकरीला लागतो. त्या वेळी मुंबईचे महापौरपद भूषवलेले दत्ताजी नलावडे यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि चांगलीच गट्टी जमली. पुढे नलावडे हे विधानसभेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करण्याची संधी लेखकाला मिळाली. त्यानंतर अरुण गुजराथी यांच्या सोबतही त्यांनी काम केले. दहा वर्षे विधिमंडळाच्या कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या झालेल्या पहिल्या भेटीचा किस्साही वाचनीय असा आहे. ‘शहापूर ते विलेपार्ले व्हाया मुंबई सेंट्रल’, ‘आणीबाणी आणि मी’, ‘मुख्यमंत्री परांजपे वाडय़ात’, ‘बाबरी मशीद आणि मुंबईतील दंगल’, ‘माझी लंडनवारी’, ‘शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे’, ‘दत्ताजी नलावडे…एक जिंदादिल व्यक्तिमत्त्व’ अशा शीर्षकांचे विविध लेख या पुस्तकात आहेत. हे सर्वच लेख केवळ लेखकालाच नव्हे, तर वाचकांनादेखील भूतकाळात नेतात.
आणीबाणीच्या काळात प्रकाश परांजपे मुंबई महापालिकेत कार्यरत होते. त्या वेळी ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे व त्यांचे सहकारी भूमिगतपणे आणीबाणीच्या विरोधात काम करायचे. पत्रके छापण्यासाठी रणदिवे यांना परांजपे हे आपल्या कार्यालयात बसून स्टेन्सिल्स करून द्यायचे. बाबरी पडल्यानंतर मुंबईत झालेली दंगल व त्यातील काही घडामोडीदेखील वाचायला मिळतात. फ्रान्स व लंडन येथील दौऱ्याच्या आठवणी लेखकाने अतिशय सोप्या पद्धतीने मांडल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वी विधिमंडळाच्या आवारात वाहिन्यांच्या प्रतिनिधींना प्रवेश नव्हता. त्यामुळे त्यांच्या कामात अनेक अडचणी निर्माण होत असत. दत्ताजी नलावडे यांचे जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करीत असताना परांजपे यांना ही बाब समजली तेव्हा त्यांच्यातील पत्रकार जागा झाला. त्यांनी लगेच पत्रकार व नलावडे यांची बैठक बोलावली. चर्चेनंतर नलावडे यांनी वाहिन्यांच्या प्रतिनिधींना विधिमंडळाच्या आवारात प्रवेश द्या, असे आदेशच जारी केले. सध्या विविध चॅनेल्सचे पत्रकार मोकळेपणाने विधिमंडळाच्या आवारात अधिवेशनाच्या काळात वावरतात, त्याचे श्रेय प्रकाश परांजपे व दत्ताजी नलावडे यांना जाते.
30 वर्षे केलेल्या पत्रकारितेचा लेखाजोखादेखील लेखकाने अतिशय सोप्या शब्दांत मांडला आहे. पत्रकारिता करताना त्यांनी शहापूर तालुक्यातील अनेक प्रश्नांना वाचा फोडली. ‘शहापूर ते विलेपार्ले व्हाया मुंबई सेंट्रल’ या लेखात 1857 साली शहापूर हे गाव कसे होते याची दिलेली माहिती वाचनीय अशी आहे. या गावातील त्यांचा परांजपे वाडा म्हणजे चालता बोलता इतिहासच. महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांनी अवघे दीडशे वयोमान असलेल्या या वाडय़ाला भेटी दिल्या आहेत. विविध आठवणींचा साक्षीदार असलेला परांजपे वाडा आपल्या शब्दांच्या माध्यमातून त्यांनी या पुस्तकात अतिशय सुरेखपणे चितारला आहे. आठवणींचा हा पासपोर्ट सर्वांनाच हवाहवासा वाटेल एवढे निश्चित.
आठवणींचा पासपोर्ट
n लेखक ः प्रकाश परांजपे
n प्रकाशक ः सिद्धार्थ प्रकाशन
n पृष्ठसंख्या ः 208 n किंमत ः 250/- रुपये