>>जे. डी. पराडकर
श्रावण महिना व्रतवैकल्यांमुळे प्रसन्न समजला जातो. शास्त्राची विज्ञानाजवळ सांगड घातली गेली की, त्यामागील हेतू अधिक महत्त्वपूर्ण ठरतो. या महिन्यात येणारा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचा सण म्हणजे जणू आनंदाला भरतीच. संपर्काची वेगवान साधने जन्म घेण्याआधी शाळकरी मुलांचे परस्परांत दररोज खूप छान संवाद होत असत. त्या काळात भेटवस्तूंचेदेखील आतासारखे अवडंबर नव्हते. त्यामुळे रक्षाबंधन जवळ आले की, शाळेतून येता-जाता मुले रस्त्यावरील दुकानांत डोकावून मनातल्या मनात कोणती राखी घ्यायची? हे हेरून ठेवायची. ज्याच्या हातावर सगळय़ात मोठी राखी तो त्या दिवसाचा जणू नायक समजला जायचा. आता राख्यांचे आकार छोटे छोटे होत एक दिवस नष्ट होतील इतपत मायक्रो झालेत. राखीचा धागा मात्र बहीणभावाच्या नात्यांची वीण पूर्वीच्याच ताकदीने घट्ट करतोय हे महत्त्वाचे आहे.
आमचं बालपण ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या कसबा गावात गेलं. या गावात आम्हाला परंपरा कळल्या, मैत्रीचे कंगोरे अधिक गहिरे कसे करत जायचे याची शिकवण मिळाली. पारंपरिक खेळ खेळून त्याचे महत्त्व जोपासता आले. कसबा या गावात साजरा केलेला श्रावण महिना बालपण सरल्यानंतर परत त्या आनंदाने कधीही साजरा करता आला नाही हे वास्तव आहे. रक्षाबंधन जवळ आली की, मित्रमंडळींची राखी घेण्यावरून मंदिरात जणू एक गोलमेज परिषद भरायची. एकमेकांना बहिणी किती? याची माहिती या चर्चेतून काढून घेत कोणाच्या हातावर सर्वाधिक राख्या बांधल्या जाणार आहेत याचा अंदाज बांधला जायचा. त्या काळात मुलांच्या हातावर महिना-पंधरा दिवसांनी पाच ते दहा पैसे कमालीचे आढेवेढे घेऊन पडायचे. महिनाभरात जास्तीत जास्त वीस पैसे साठायचे. असं असताना तीन ते अगदी पाच रुपयांची भलीमोठी राखी घेण्याचा प्रत्येकाचा मानस असायचा. राखी जरी बहिणीने घेऊन भावाच्या हातावर बांधायची असली तरी त्या काळात राखी जणू दागिन्यासमान वाटत असल्याने भावांची बारीक नजर दुकानातील राख्यांवर असायची. घरापासून शाळेत जाण्याचे अंतर अधिकतर फर्लांगभर. मात्र एवढय़ाशा अंतरात खाऊची चार-पाच दुकाने होती. यातील रंग्यामामाचे आणि अण्णा मोरेंचे दुकान मुलांची खास आकर्षणाची ठिकाणं होती. या दुकानातल्या विविध आकारांच्या आणि प्रकारच्या हिंदुस्थानी बनावटीच्या राख्या मुलांना आकर्षित करून घ्यायच्या. जसजसा रक्षाबंधनाचा सण जवळ यायचा तसतसं या राख्यांबद्दलचं आकर्षण वाढत जायचं आणि मनातल्या मनात त्यातील वेगवेगळ्या राख्या आपल्या हातावर बांधल्याची कल्पना केली जायची.
हळूहळू दुकानात जाऊन आवडलेल्या राखीची किंमत विचारत “ही मला ठेवा” असं दुकानदाराला विश्वासाने सांगितलं जायचं. आपण हेरून ठेवलेली राखी अन्य कोणी घेऊ नये यासाठी मित्रांनाही तशी समज दिली जायची. त्या काळातील राख्या म्हणजे खरंच एक प्रकारचा दागिनाच होता. तळात चांदीचा कात्री मारलेला कागद, त्यावर कोरीव रंगीत स्पंज, विविध रंगीत खडे आणि मोरांचे-पक्ष्यांचे आकार लक्षवेधक असायचे. खरं तर मुलांसाठी त्या काळी सोन्याचांदीचं साधं गळ्यातील पान मिळणं अशक्य असल्याने राखी हाच दिलखेचक दागिना वाटायचा. रक्षाबंधन आठ दिवसांवर आली की, तीन रुपयांची जमवाजमव करताना जी काही दमछाक व्हायची ती डोळ्यांत पाणी आणणारी असायची. अशा वेळी मदतीला धावून येणारी हक्काची व्यक्ती म्हणजे आई नाहीतर कधी मोठा भाऊ अथवा अन्य नातेवाईक धावून यायचे. अखेरीस राखीच्या किमतीएवढी रक्कम हातात आली की, जणू जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. ही रक्कम दोन-चार वेळा मोजून मुठीत घट्ट धरून दुकानदाराच्या हाती गेली की, जीव भांडय़ात पडायचा. मनात हेरून ठेवलेली राखी कागदात बांधून हाती आल्यानंतर घर कधी आलं ते पावलांनादेखील कळायचं नाही. रक्षाबंधनचा दिवस येईपर्यंत दिवसातून दोन-तीनवेळा तरी हळूच ही राखी कागदातून सोडून डोळे भरून पाहिली जायची. मनाजोगती राखी एकटक लावून पाहताना भान हरपून जायचं.
रक्षाबंधनच्या दिवस कधी एकदा उजाडतोय या अपेक्षेने आदल्या दिवशी अंथरुणाला पाठ टेकायची. राखीच्या स्वप्नात झोप कधी लागायची हे कळायचंच नाही. शाळेत जाताना आपल्या पसंतीने स्वत आणलेली राखी बहिणीकडून प्रथम बांधून घेताना खूप काही मिळवल्याचं समाधान चेहऱयावर तरळून जायचं. यानंतर बहिणीने आणलेली राखी मग चुलत-मावस-आते-मामेबहीण अशा सर्वांच्या राख्या क्रमाने बांधल्या जायच्या. राखीचे हे बंधन मजबूत आणि न तुटणारं होतं. आता गेली काही वर्षे बाजारात येणाऱया चिनी राख्या व्यावसायिक असल्याने त्यात मायेची गुंफण कमी असल्याचं जाणवतं. आता राख्या आकारानेही लहान झाल्या आहेत. व्हॉटसआपमुळे प्रतीकात्मक राख्याही उपलब्ध झाल्याने रक्षाबंधन सणातील महत्त्व सोयीनुसार अबाधित ठेवण्याची प्रथा सुरू झाल्याचे दिसून येते. सणातील बदल काळानुरूप होत असल्याने बदल स्वीकारणे अपरिहार्य आहे. असं असलं तरी आजही हा सण आल्यानंतर मला बालपणीची ती राखी आठवते आणि माझं मन रंग्यामामा आणि अण्णा मोरेंच्या दुकानाकडे धाव घेतं.
– [email protected]