>>धीरज कुलकर्णी
बी. एड होऊन नोकरीसाठी धडपडणाऱ्या माधवला जवळच्या गावात शिक्षकाची नोकरी मिळते.
देशी दारूचे दुकान असलेल्या दत्तू पाटीलने शाळा मंजूर करून घेतली आहे. शाळेच्या इमारतीचा पत्ताच नाही. इकडचे तिकडचे लोक गोळा करून शाळेचे कर्मचारी भरलेले. दत्तूच्या भल्यामोठय़ा घराशेजारील गोठय़ात भरणार शाळा. कशाचाच पत्ता नाही… मुलांचाही! शाळेतील माणसांनीच गावभर फिरून मुले गोळा करायची. सगळे गाव म्हणजे अस्सल नमुन्यांचे.
माधवची दमछाक होते. घरची गरिबी, ग्रामीण भागात मिळणारा कमी रोजगार यामुळे माधवला ही नोकरी धरून राहणे भाग पडते. अनेक महिने पगाराचा पत्ता नाही. नंतरही मिळणारा तुटपुंजा पगार, कसेबसे झालेले लग्न, नोकरी टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अपरिहार्य तडजोडी, सतत होणारी मानहानी यामुळे माधव आतून उद्ध्वस्त होतो. जो आदर्शवाद उराशी बाळगून त्याने शिक्षकी पेशा पत्करला, त्याच्या डोळ्यांसमोर चिंधडय़ा झालेल्या त्याला दिसतात. कुठेही आशेची वाट दिसत नसल्याने अखेरीस माधवला वेड लागते.
‘रिंगाण’, ‘झड झिंबड’ यांसारख्या ताकदीच्या कादंबऱ्यांनंतर साहित्य अकादमी विजेते कृष्णात खोत यांची अस्वस्थ करणारी ही नवी कादंबरी…‘काळ्या माळ्या भिंगोळ्या’ या कथेत लेखकाने अनेक बारकावे मांडलेले आहेत. त्यामुळे कथेतील वेदना ही वाचकाला अधिक खोलवर भिडते. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करणारी एवढेच या कादंबरीचे स्वरूप न राहता, एकूणच मोडकळीला आलेली ग्रामीण समाज रचना याचे दर्शन इथे आपल्याला घडते.
स्वत लेखक ग्रामीण भागाशी जोडलेला असल्याने त्यांच्या लेखनात एक सच्चेपणा आढळतो. कादंबरीत ते वापरत असलेली उदाहरणे, घटना, पात्रे यांना जिवंतपणा मिळाला आहे. कादंबरी आकृतिबंधात पात्रांचा जो व्यापक पट आहे, तो सर्व कुठल्या ना कुठल्या प्रकारे शिक्षणक्षेत्राशी संबंधित आहे. अगदी छोटी पात्रे, उदा. एसटीतून जाताना भेटलेले सर हेसुद्धा इथे भाष्य करतात.
वास्तवाचे प्रखर दर्शन करणारी ही कादंबरी असल्याने येथे प्रतिमा, रूपके यांचा वापर लेखकाने कटाक्षाने टाळला आहे. असे भाष्य करणाऱ्या कादंबऱ्या यापूर्वी येऊन गेल्या आहेतच, मात्र या कादंबरीचा पैस व तिची रचना यात आपल्याला वेगळेपणा आढळतो. लेखक या कथेचा परीघ जाणीवपूर्वक मर्यादित ठेवतो.
ही माधव व त्याच्या आसपासच्या पात्रांची कथा आहे. ग्रामीण भाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण या परिघात ही कथा वावरते. मात्र, छोटे छोटे प्रसंग, विसंगती दाखवून देणारे संवाद यातून लेखक कथा पुढे नेतो. या कादंबरीला विनोदी टच देता आला असता, पण विषयाचे गांभीर्य नष्ट झाले असते.
शिक्षणाचा विषय घेऊन ग्रामीण भागातील आजचे भेदक चित्रण लेखकाने केले आहे. यात तेथील जात वास्तवही आले. ही कादंबरी काल्पनिक स्थळ, काळ, पात्रांची असली तरी त्यासाठी केलेले ग्राऊंड वर्क भक्कम आहे. अन्यथा फिक्शनमध्ये जो कल्पनाविलास असतो, त्याच्या आधारे ही कादंबरी रचणे अशक्य होते.
ऐंशीच्या दशकात शासनाने विनाअनुदानित शाळांना परवानगी दिल्यानंतर गेल्या चाळीस वर्षांत, विशेषत ग्रामीण भागात अक्षरश पेव फुटल्याप्रमाणे शाळा निघाल्या. बोगस विनाअनुदानित शाळांचे ग्रामीण भागात पसरलेले अर्थकारण… शेतकरी आत्महत्येचे हेही एक कारण असल्याचे धक्कादायक वास्तव इथे आपल्याला दिसते.
बी. एड होणे म्हणजे बाद होणे… नायक स्वतशी म्हणतो. जणू तो संस्थाचालकांचा घरगडी. माधवपेक्षा कमी शिक्षण घेतलेली मुले ही काही ना काही कामधंदा शोधून स्थिरस्थावर झालेली. माधवला त्यांची आर्थिक मदत घ्यावी लागणे बोचते. दिवसेंदिवस बिकट होत जाणाऱ्या या परिस्थितीत कुठेही आशेचा किरण न आढळल्याने वाचकही अस्वस्थ होतो. यावर उपाय काय? हा स्वतशी विचार करतो.
लेखकाने जरी कथा ग्रामीण शिक्षण आणि व्यवस्था यावर केंद्रित ठेवलेली असली तरी ती अनेक क्षेत्रांत शहरी भागातही लागू करता येते. त्यामुळे वरकरणी कादंबरीत कथा केंद्रित वाटली तरी तिचा पैस या अर्थाने व्यापक आहे.
पॉप्युलर प्रकाशन यांनी कादंबरीचे संपादन, मांडणी यात विशेष मेहनत घेतलेली दिसते. त्यामुळे कादंबरी मोठी असली तरी ती कंटाळवाणी न होता वाचकाचा रस शेवटपर्यंत टिकून राहतो.
काळ्यामाळ्या भिंगोळ्या
n लेखक ः कृष्णात खोत
n प्रकाशक ः पॉप्युलर प्रकाशन
n पृष्ठसंख्या ः 454 n किंमत ः 695/- रुपये