माझा नवरा सीए आहे, दहावी पास अर्थमंत्री नाही अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला आहे. तसेच आपले उत्पन्न कुठून येतं याचा पुरावाच दमानिया यांनी दाखवला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी अंजली दमानिया यांच्यावर टीका केली होती. तसेच दमानिया यांच्या उत्पन्न स्रोतांवरही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर पत्रकार परिषद घेऊन दमानिया म्हणाले की मी डॉक्टर होते. 2011 पर्यंत मी प्रॅक्टिस करत होते. पण नंतर इंडिया अगेन्स करप्शन आणि आपसोबत काम सुरु केल्यानंतर मला वेळ मिळत नव्हता. म्हणून चांगली सुरू असलेली प्रॅक्टिस मी सोडून दिली. माझे पती हे नावाजलेले सीए आहेत. या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून केंद्राला 27 हजार कोटी रुपयांचा टॅक्स गेला आहे. त्यापैकी मी आणि माझ्या पतीने दोन कोटी रुपयांचा टॅक्स भरला असे दमानिया म्हणाल्या. माझा पती दहावी पास अर्थमंत्री नाही असा टोलाही त्यांनी लगावला. सामाजिक कार्यकर्ते फटीचर नसतात. अजित पवार जेव्हा वेगळे झाले तेव्हा त्यांनी खैरातीसारख्या गाड्या वाटल्या. यासाठी पैसे आले कुठून? असा सवालही त्यांनी विचारला.