>> मेघना साने
काळसर्प सरपटत पुढे जात असतो. काळाच्या पोटात काय दडले आहे हे कुणालाच ठाऊक नसते. कधी कधी तो असा काही वेटोळे घालून बसतो की, माणसाचा जीव गुदमरू लागतो. त्यातून त्याला सोडविणाराही काळच असतो. कवयित्री शिरीष पै यांच्या ‘वडिलांच्या सेवेसी’ या पुस्तकात त्यांनी आचार्य अत्रे यांच्या जीवनातील काही घटना अभिमानाने सांगितल्या आहेत, तर आपल्या पप्पांच्या अंत्यसमयी त्यांना झालेल्या क्लेशांचे वर्णन हृदय पिळवटून टाकणारे आहे.
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाची सांगता 11, 12 व 13 ऑगस्ट रोजी पुणे येथे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, पुणे व ‘आत्रेय, मुंबई’ यांच्या संयुक्त विद्यमाने अत्रे यांच्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करून झाली. या महोत्सवात अत्रे यांचे ‘श्यामची आई’, ‘जोतिबा फुले’, ‘ब्रँडीची बाटली’ आदी चित्रपट दाखविण्यात आले. तसेच आचार्य अत्रे लिखित पुस्तके पुनर्प्रकाशित करण्यात आली. कार्यक्रमाचे पाहुणे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना ‘आचार्य अत्रे विशेष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याच समारंभात डिंपल प्रकाशनचे शिरीष पै लिखित ‘वडिलांच्या सेवेसी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. 1987 साली लिहिलेल्या या पुस्तकाची ही चौथी आवृत्ती प्रकाशित होत होती.
आचार्य अत्र्यांचे कुटुंब म्हणजे केवळ आई, पप्पा आणि दोन मुली इतकेच नव्हते, तर अत्रे थिएटर्सचे कलावंत, दै. ‘मराठा’चे कर्मचारी, परचुरे यांच्यासारखे प्रेमळ स्नेही, जवळची वकील मंडळी, विश्वासू ड्रायव्हर आणि त्यांचे लाडके पाळीव कुत्रे हे सारे त्यांच्या कुटुंबाचा भाग होते. लाडकी कन्या नानी (शिरीष) आणि तिचे पती व्यंकटेश हे तर त्यांचे दोन हातच होते. नानीची मुले राजू आणि दित्त्यू हे तर प्राणांहून प्रिय. अत्रे वडील म्हणून कसे होते आणि आजोबा म्हणून कसे होते हे अनेक उदाहरणे देऊन शिरीषताईंनी वर्णन केले आहे.
एकदा अत्रे महाविद्यालयात भाषण देत असताना त्यांचा कुत्रा ‘जॅक’ हा अत्र्यांचा माइकवरील आवाज ऐकून धावत व्यासपीठावर आला व त्यांच्या पायाशी मुकाट बसून राहिला, तर जॅकने आज माझे भाषण ऐकले असे कौतुक ते सगळ्यांना सांगत सुटले.
नानीने प्रेमविवाह केला. तेव्हा तिचे पती व्यंकटेश पै यांची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती. हे लग्नच अत्र्यांना पसंत नव्हते. तरी नानीचे व्यंकटेशवर प्रेम आहे हे जाणून तिचे थाटात लग्न लावून दिले. त्यांची राहण्याची सोय करण्यासाठी आधीच घेऊन ठेवलेल्या ब्लॉकमध्ये त्यांची नीट व्यवस्था केली. नानीचे पती व्यंकटेश आणि आचार्य अत्रे यांनी ‘नवयुग’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या कचेरीत अनेक वर्षे एकत्र काम केले. ‘नवयुग’च्या पडत्या काळात शिरीष आणि व्यंकटेश यांनी दैनिकाची व्यवस्था सांभाळली. आचार्य अत्रे त्यामुळे ‘श्यामची आई’, ‘जोतिबा फुले’ या चित्रपटांच्या निर्मितीत व्यग्र राहू शकले.
आपल्या आईचे व्यक्तिमत्त्वही शिरीषताईंनी उत्तम रीतीने रेखाटले आहे. आईने शिक्षिका आणि पुढे मुख्याध्यापिका म्हणून नोकरी केली. ती आर्थिकदृष्टय़ा पतीवर अवलंबून राहिली नाही. ट्रेनिंग कॉलेजवर ती मुख्याध्यापिका म्हणून असताना तिने वसतिगृहदेखील सांभाळले. वसतिगृहाच्या असंख्य कटकटी तिच्या डोक्यावर टांगलेल्या असायच्या. एकदा शिक्षकांचा संप झाला तेव्हाही तिने धीराने तोंड दिले. मात्र तऱहेवाईक स्वभाव असणाऱया आपल्या पतीच्या वागण्याला ती आळा घालू शकत नव्हती. नवरा-बायको म्हणून त्यांच्यात कुरबुरी होत राहिल्या. काही वर्षे अत्रे आपल्या कुटुंबापासून दूर राहायला गेले. शेवटी सारे एकत्रच आले. शिरीष पै लिहितात, ‘आईला काय हवे ते पप्पा आणून देत असत. हिऱयांच्या कुडय़ा, साडय़ा, तंदुरी चिकन, वाढदिवस साजरा करणे… सगळे केले. पण ते स्वत तिला अख्खेच्या अख्खे मिळाले नाहीत. ते तिचे होतेही आणि नव्हतेही.’
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि अत्र्यांच्या जळजळीत लेखांनी ‘नवयुग’चा खप प्रचंड वाढला. त्यांच्या जहाल भाषणांनी महाराष्ट्र पेटला. आंदोलनाचे नेतृत्त्व करताना ‘नवयुग’कडे लक्ष द्यायला त्यांना विश्वासाचा माणूस हवा होता. या वेळी आपल्या जावयावर व्यंकटेश पै याच्यावर त्यांनी धंद्याची सूत्रे सोपवली. तो राजकीय पक्षात काम केलेला कार्यकर्ता होता. खंबीर होता आणि अत्र्यांवर मनापासून प्रेम करत होता. त्याने ‘नवयुग’चे आर्थिक व्यवहार डोळ्यांत तेल घालून सांभाळले आणि अत्र्यांवर असलेले कर्जही फेडले. 1951 साली अत्रे तुरुंगात गेले. चळवळ सुरूच होती. या वेळी शिरीष आणि व्यंकटेश यांनी त्यांचा व्यवसाय सांभाळला.
आचार्य अत्र्यांनी 1956 मधे ‘मराठा’ दैनिक सुरू केले. या काळात त्यांना अफाट लोकप्रियता मिळाली. अत्र्यांचे अग्रलेख सारा महाराष्ट्र अधाशासारखे वाचत आणि रिचवत होता. या वेळी संपादकीय अत्रे स्वतच लिहीत. शिरीष पै लिहितात, ‘हे सर्व करताना त्याची उत्तम चाललेली वकिली त्याला सोडावी लागली. अत्रेही आपल्या जावयाला मालक म्हणूनच वागवत. मात्र भोवतालची मंडळी व्यंकटेशला तुच्छतेने वागवत होती. अत्र्यांचा मॅनेजर समजत होती. हे त्याच्या मनाला लागत होते.’
‘मराठा’मध्ये काम करण्याचा काळ हा शिरीष पै यांच्या आयुष्यातील आनंदाचा काळ होता. पुढे अत्र्यांचे व व्यंकटेशचे राहणीमान उंचावले आणि त्यांना मद्याची सवय लागली. व्यंकटेश यांचा तापट स्वभाव बाहेर आला. त्यानंतर शिरीषताईंच्या आयुष्याची परवडच झाली. त्यांना वैवाहिक जीवनात मनस्ताप, अपमान आणि दुःख यांच्याशी सामना करावा लागला.
1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. आचार्य अत्रे यांचे एक स्वप्न पूर्ण झाले, पण चळवळीच्या काळात त्यांच्याकडे जे पुढारीपण आले होते त्याला नंतर हादरे बसू लागले. पण उद्विग्न मनस्थिती असतानाही एकीकडे त्यांचे ‘मोरूची मावशी’, ‘बुवा तेथे बाया’, ‘मी मंत्री झालो’, ‘तो मी नव्हेच’ ही नाटके लिहिणे सुरूच होते. पण ‘मराठा’तील भानगडी काढण्याच्या तंत्रामुळे अत्र्यांवर अब्रूनुकसानीचे काही दावेही सुरू होते.
13 जून 1969 ला KEM मध्ये अत्र्यांचे प्राणोक्रमण झाले. त्यापूर्वी त्यांना भ्रम होत होता. ‘मला जाऊ द्या रे’ असा आरडाओरडा करत ते धावत निघायचे. कुडीतून आत्मा बाहेर निघण्यासाठी त्यांचा आत्मा तडफडत होता. डॉक्टरांनी आणि नातलगांनी त्यांना थोपवून धरले. अखेर लिव्हरच्या दुखण्यामुळेच त्यांचा अंत झाला. ते गेले तरी त्यांनी केलेले कार्य आपल्याला विसरता येणार नाही.