शहर खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीएच्या वतीने 384 कोटी रुपये खर्च करून 21.80 किलोमीटरचे नवीन रस्ते बनवले जात आहेत. त्याशिवाय काँक्रीटीकरण, गटारांवर स्लॅब टाकणे, खड्डे बुजवणे अशी कामे सुरू आहेत. पण प्रत्यक्षात 384 कोटी रुपये खर्च करूनही मीरा-भाईंदरमधील रस्ते उखडले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. निकृष्ट कामामुळे अनेक रस्त्यांवर भेगा पडल्या असून सिमेंट, खडी व अन्य साहित्य योग्य प्रमाणात वापरले जात नाही. एमएमआरडीएच्या भ्रष्ट कारभाराचा त्यामुळे पंचनामा झाला असून कोट्यवधी रुपये कोणाच्या घशात गेले, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.
मीरा-भाईंदर शहरात 47 विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याची निविदा गेल्या वर्षी 24 मार्च रोजी काढण्यात आली होती. या कामाची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी चार भागांमध्ये निविदेचे विभाजन करण्यात आले. एका कंत्राटदाराला केवळ एकच निविदा मिळेल अशी अट घातली होती. पण पात्र झालेले ठेकेदार काम करीत असताना अक्षरशः चुना लावत असल्याचे आढळून आले आहे. एन. ए. कन्स्ट्रक्शन कंपनी, मॉ मुंबादेवी कन्स्ट्रक्शन कंपनी, एम.ई. इन्फ्रा कंपनी, मे. बिटकॉन, आर.ई. इन्फ्रा या कंपन्यांना रस्त्यांचे कंत्राट दिले आहे.
■ सिमेंटचे रस्ते बनवताना ड्रायक्लिन काँक्रीट वापरणे आवश्यक आहे. पण हे काँक्रीट ठेकेदार बऱ्याच वेळा गायब करतात.
■ जुन्या डांबरी रस्त्याची खोदाई करून रात्रीच्या वेळेस काँक्रीटचे काम केले जाते. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
■ चार नंबर खडीमिश्रित लेअरची जाडी 225 एमएम ठेवणे गरजेचे असताना प्रत्यक्षात 80 ते 100 एमएम एवढीच जाडी ठेवण्यात येते. मटेरिअलचे पैसे कोणी हडप केले, असा सवाल केला जात आहे.
हयगय सहन करणार नाही
सर्व ठेकेदारांनी नियमितपणे काम करणे अपेक्षित आहे. मात्र नियमांचे उल्लंघन कुणी करीत असेल तर उपअभियंता व कन्सल्टंट यांना सांगून त्वरित कामाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. कोणाचीही हयगय सहन करणार नाही, असा इशारा एमएमआरडीएचे अभियंता अजय तितरे यांनी दिला आहे.