
महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले तर राज्यातील पुढचे सरकार आपलेच असेल ही काळय़ा दगडावरची रेष आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी म्हणाले.
400 पारची घोषणा देणारे 240 वर थांबल्याने घाबरले आहेत. त्यामुळे ते निवडणूक घ्यायलाही घाबरत आहेत, असे जयंत पाटील म्हणाले. सिव्हिल कोडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेक्युलर हा शब्द वापरावा लागला यातच त्यांची हार आहे, असे ते पुढे म्हणाले.
हिंदू संस्थानाच्या जमिनी लाटल्या गेल्या आहेत. त्या जमिनी भाजप नेत्यांना विकल्या गेल्या. या जमिनी वर्ग-2 च्या मधून वर्ग-1 मध्ये घेण्याबाबत पॅबिनेट निर्णय घेतला गेला. केवळ भाजपच्या नेत्यांना फायदा व्हावा म्हणून हा निर्णय घेतला गेला, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
महायुतीचे सरकार राज्यातील सहा हजार किलोमीटर रस्ते सिमेंट-काँक्रीट करणार आहे. ज्यांच्याकडे कर्मचारी नाहीत त्या एमएसआरडीसीवर हे काम सोपवण्यात आले आहे. 37 हजार कोटींचे काम हे मंडळ करणार आहे. नांदेडहून जालनाकडे जाणाऱया रस्त्यासाठी एक किलोमीटरला 83 कोटी रुपये खर्च दाखवला जात आहे. अलिबाग-विरार रस्त्यासाठी 26 हजार कोटी रुपये खर्च केला जात आहे, कुणाकडे जायला हा खर्च होतोय, असा सवाल जयंत पाटील यांनी केला.
महायुतीकडून राज्याची लूट सुरू आहे – नसीम खान
महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार प्रचंड वाढला असून दर वाढवून टेंडर द्यायचे व त्यातून टक्केवारी घ्यायची अशी राज्याची लूट सुरू आहे, अशी टीका यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली. मुंबईत आता महायुतीचा कुकर घोटाळा सुरू झाला आहे. भाजपने वक्फ बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा पुढे आणला आहे; परंतु हिंदू धर्माच्या देवस्थानची जमीन असो वा मुस्लिम धर्माच्या देवस्थानच्या जमिनींना हात लावाल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मोक्याच्या जागा लाडक्या मित्राला – वर्षा गायकवाड
महायुती सरकारची लाडकी बहीण योजना तर आत्ता आली. लाडका मित्र योजना गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या मित्रांना मुंबईतील मोक्याच्या जागा दिल्या जात आहेत, असा हल्ला मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या दोन वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढू, असे त्या म्हणाल्या. लाडकी बहीण योजनेची सध्या चर्चा सुरू आहे. महायुती सरकार बहिणींना नाही तर मतांसाठी पैसे देत आहे, पण हे पैसे परत घेण्याची धमकीही देत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
राज्यातील बेकायदेशीर सरकारही घरी बसवणार – बाळासाहेब थोरात
लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे, राज्यातील बेकायदेशीर सरकारलाही घरी बसवण्याची जनतेची भावना आहे, असे याप्रसंगी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले. लोकसभा निवडणुकीत भाजपच्या 10 वर्षांच्या मनमानीला जनतेने उत्तर दिलेले आहे. महाराष्ट्राचा आवाज आता दिल्लीत वाढला आहे, असे थोरात म्हणाले. महायुती सरकारचे घोटाळे उघड करताना महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच आठवडय़ात शेतकऱयांना कर्जमाफी दिली हे सांगा. आघाडीच्या चांगल्या कामांची माहिती जनतेला द्या, असे आवाहन थोरात यांनी यावेळी पदाधिकाऱयांना केले.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जनता ठरवणार -जयंत पाटील
शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही या मेळाव्यात भाषण केले. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा व्यासपीठावर बसलेले नेते ठरवणार नाहीत तर खालची जनता ठरवणार, असे ते म्हणाले. लोकसभेच्या विजयामध्ये शेकापसारख्या छोटय़ा पक्षांचे योगदान आहे आणि विधानसभेच्या काही जागांमध्येही आमचा वाटा आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी यावेळी शेकापही विधानसभेसाठी आग्रही आहे, असे अप्रत्यक्षपणे सांगितले. आमच्यासारख्या छोटय़ा पक्षांनी लोकसभेच्या काळात केलेल्या कामगिरीची आठवण ठेवा, अशीही विनंतीही त्यांनी केली.