वेधक – गिरणगावाचे वास्तव

>> अनघा सावंत

एखादी व्यक्ती जन्मतच संवेदनशील मन घेऊन येते. जगात वावरताना तिचं मन सतत काही ना काही टिपत असतं, ते मनात रुजवत असतं. खरं तर त्या मनाचं एक वेगळंच अवकाश असतं. अशाच एका संवेदनशील मनात खोलवर रुजलेल्या काळाच्या, प्रसंगांच्या, विचारांच्या आणि भावनेच्या बीजातून प्रसवलेली कलाकृती म्हणजे ‘आणखी एक मोहेंजो दारो’ ही डॉक्युमेंटरी…

ज्येष्ठ चित्रपट समीक्षक, जागतिक सिनेमाचे अभ्यासक, उत्कृष्ट कथा-पटकथा लेखक आणि दिग्दर्शक अशोक राणे यांनी साकारलेली ‘आणखी एक मोहेंजो दारो’ ही डॉक्युमेंटरी म्हणजे मुंबईच्या गिरणगावातील जवळपास लयाला गेलेल्या समृद्ध संस्कृतीचे वास्तव दर्शन घडवणारा एक मौल्यवान ठेवा आहे.

अशोक राणे यांचं बालपण गुजरातमधील नवसारी या शहरात गेलं. त्यांचे वडीलही गिरणी कामगार होते. त्यामुळे पहिलं गिरणगाव त्यांनी अनुभवलं ते नवसारीत. मग मुंबईचं गिरणगाव त्याचे सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय पैलू, त्याची विविध स्थित्यंतरं अनुभवतानाच 2015 मध्ये गिरणगावावर फिल्म करायचं त्यांनी मनाशी ठरवलंच होतं. याविषयी ते म्हणाले, गिरणगाव मी लहानपणापासून पाहत, अनुभवत आलो आहे.

मी जेव्हा ही फिल्म लिहायला घेतली तेव्हा माझ्या डोक्यात सगळं पहिल्यापासून निश्चित होतं. त्या वेळी मी प्रभादेवीला राहत होतो. महाराष्ट्राच्या विविध प्रदेशांतून तसेच हिंदुस्थानच्या इतर भागांतून गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी आलेले असंख्य लोक होते. ते विविध जातीधर्मांचे असली तरी खऱ्या अर्थाने मात्र त्यांचा धर्म नि जात एकच होती, ती म्हणजे गिरणी कामगार! प्रत्येकाची भावनाच तशी होती. एकमेकांविषयी ममत्व, आदर होता. अडाणी, अशिक्षित, अंगठेबहाद्दर असले तरी याच कामगारांनी एक वैशिष्ट्यपूर्ण गाव उभं केलं… गिरणगाव! विविध भाषा, प्रथा, परंपरा, खेळ, संस्कृती, सण, उत्सव अशी एक उत्तम संस्कृती निर्माण केली. गिरण्यांच्या 1982 च्या अभूतपूर्व संपानंतर मात्र हळहळू हे सगळं लयाला जाऊ लागलं. तो संप गिरणगावचा काळ ठरला आणि त्या संपाने इथला कामगारही संपला. गिरणगावचे अस्तित्वच संपुष्टात आले. तिथली संस्कृती लयाला गेली. गिरणगाव म्हणजेच अजून एक मोहेंजो दारो ठरलं.

ही डॉक्युमेंटरी करायचं जेव्हा नक्की झालं, तेव्हा पटकथेसाठी राणेंच्या नजरेसमोर एकच व्यक्ती आली, ती म्हणजे जयंत पवार. यावर चर्चा करण्यासाठी ते पवारांच्या कार्यालयात गेले. राणेंनी जेव्हा पवारांना सांगितलं, मी ‘गिरणगाव उद्ध्वस्त झालं’ अशी एक डॉक्युमेंटरी करतोय आणि त्याच्यावर एक फिल्म करतोय, त्याचं नाव ‘आणखी एक मोहेंजो दारो’. तेव्हा पवार त्वरित म्हणाले,’’अरे, तू एका ‘मोहेंजो दारो’मध्येच मला हे सांगतोयस.” कारण पवार यांचं कार्यालय होतं ते कमला मिल कंपाऊंडमध्ये!

गिरणगावाचे सर्व पैलू केवळ दोन-अडीच तासांच्या मर्यादित डॉक्युमेंटरीत साकारणं तसं कठीणच… तरीही हे सर्व डॉक्युमेंटरीत आणण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला आहे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात गिरणी कामगारांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका, गिरण्यांत काम केलेल्या आणि आता हयात असलेल्या काही गिरणी कामगारांच्या मुलाखती, त्यांनी जागवलेल्या आठवणी, हुतुतू हा त्या वेळचा लोकप्रिय खेळ, गिरणगावात जपला जाणारा धार्मिक आणि जातीय बंधुभाव, गिरणगावाने जन्माला घातलेली कामगार रंगभूमी आणि त्यातून उदयाला आलेले मराठमोळे कलावंत, गिरणगावातील नाटकांच्या रंगलेल्या तालमी, त्या वेळी पडद्यावर दाखवले जाणारे सिनेमे आणि दिवाळीत चाळीतील आनंदाने एकत्रित येऊन फराळ करण्याची दृश्यं, नळावरील भांडणं, चाळीतील हळुवार प्रेमप्रकरणं इ. तसेच गिरणगावची खास ओळख असलेला गणेशोत्सव, दहीहंडी, होळी हे सण-उत्सव.

याशिवाय तमाशा, भारुडं, नमन, दशावतार, भजनं, उभी भजनं, बाल्या डान्स, जात्यावरच्या पहाटेच्या ओव्या, पाळणा तसेच ऑर्केस्ट्रा इ. त्या काळातलं जे जे शक्य झालं ते ते सर्व दाखवण्याचा किंवा शब्दांच्या माध्यमातून उभं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न या डॉक्युमेंटरीत केला आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

फिल्म साकारताना कोविड काळ, लॉकडाऊन, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर आलेली बंदी, कोरोनामुळे ज्यांचे अनुभव चित्रबद्ध करायचे, असे अनेक जाणते गिरणगावकर जग सोडून गेलेले, अशा अनेक अडचणींचा सामना करत ही डॉक्युमेंटरी अखेर आकाराला आली. गिरणगावात एकेकाळी गरीब गिरणी कामगारांनी उभी केलेली श्रीमंत आणि समृद्ध संस्कृती नांदत होती, या वास्तवाचे समग्र दर्शन घडवणारी ही कलाकृती आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बर्लिनच्या इंडो-जर्मन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘आणखी एक मोहेंजो दारो’ या डॉक्युमेंटरीला बेस्ट डॉक्युमेंटरी : ऑडियन्स अवॉर्ड मिळालं आहे. तसंच 2023-24चा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला असून नॉन-फिचर विभागात ही डॉक्युमेंटरी, सर्वभाषिक सर्वोत्तम चरित्र/ऐतिहासिक/संकलन या विभागात सर्वोत्कृष्ट ठरली आहे.

[email protected]