रोखठोक – तिरंगा सुरक्षित आहे, कारण…

ज्यांनी भारतीय तिरंग्याचा द्वेष केला व स्वातंत्र्यानंतरही 56 वर्षे तिरंगा फडकवणारच नाही अशा विचारधारेचे वंशज सत्तेवर आहेत व सत्ता आहे म्हणून ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत असताना कश्मीरात पुन्हा आमच्या जवानांनी बलिदान दिले. तिरंगा म्हणूनच सुरक्षित आहे.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काडीचे योगदान नसलेले लोक मागच्या दहा वर्षांपासून लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवत आहेत व देशाला स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक, दुसरे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी ‘तिरंगा’ ध्वज त्यांना मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले होते. “तिरंगा राष्ट्रासाठी अशुभ ठरेल. कारण तीन संख्या हिंदू धर्मासाठी अशुभ असते,” असा तर्क श्री. गोळवलकर गुरुजी यांनी मांडला होता. त्यावर सरदार पटेल यांनी सरसंघचालकांची शाळा घेतली. सरदार म्हणाले, “काय बोलायचे अशा माणसाविषयी? त्यांना हिंदू धर्मच समजू शकला नाही. ज्यांना हे माहीत नाही की, हिंदू धर्माच्या मुख्य देवताच ‘तीन’ आहेत. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. त्यांना तीन आकडा अशुभ वाटावा हे हिंदू धर्माबाबत त्यांचे अज्ञान आहे.” अशा हिंदू धर्माच्या राजकीय ठेकेदारांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाकडेही पाठ फिरवली. त्यामुळे अयोध्येत चोरांचे व अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. लोकसभा निवडणुकीत लाभ व्हावा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी घाईघाईने मंदिर उद्घाटनाचा राजकीय उत्सव अयोध्येत पार पाडला, पण राम त्यांना पावला नाही. मोदी यांच्या काळात अयोध्येचे नवे राममंदिर गळत आहे व श्रीरामाच्या गर्भगृहात रामाच्या बचावासाठी छत्री धरावी लागत आहे. संपूर्ण अयोध्येत चोरांचे राज्य निर्माण झाले आहे. रामपथावर लावलेल्या 3,800 बाम्बू लाईट आणि 36 गोबो प्रोजेक्टर दिवे चोरीला गेले. रामपथावर आज अंधार आहे. जणू रामराज्य भाजपने अंधारात बुडवले. चोरांनी रामालाही सोडले नाही. हे यांचे कायद्याचे राज्य! या राज्याची चौकीदारी मोदी व शहा करीत आहेत.

तिरंग्यास विरोध

भारताने आपला 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. बहुमत गमावलेले आपले पंतप्रधान श्रीमान मोदी यांनी तरीही लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला, ज्या तिरंग्यास त्यांच्या मार्गदर्शक संघटनेचा विरोध होता. या वेळी मोदी यांनी 400 जागा खरोखरच जिंकल्या असत्या तर त्यांनी पुढील तीन गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या.

1) भारतीय चलनावर महात्मा गांधींऐवजी स्वत:चा फोटो टाकण्याची इच्छा पूर्ण करून घेतली असती.

2) संविधान त्यांनी नक्कीच बदलले असते.

3) ‘तिरंगा’ बदलण्याचे मनसुबेही तडीस नेले असते.

या ‘तीन’ महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी घडवून आणल्या असत्या. ‘तीन’ हा आकडा संघ विचारधारा मानणाऱ्यांसाठी अशुभ असला तरी या तीन गोष्टी मोदी यांनी नक्कीच घडवून आणल्या असत्या व त्यासाठी तहहयात आपणच पंतप्रधान राहू हा ‘पुतीन पॅटर्न’ लागू करण्यासाठी संविधानातील लोकशाही, स्वातंत्र्यविषयक कलमे बदलायलाही त्यांनी पावले टाकली असती, पण भारतीय जनतेने हे होऊ दिले नाही!

सुजाण भारतीय जनतेने तिरंग्याचे, स्वातंत्र्याचे व संसदेचे रक्षण केले आहे.

राजकीय अभियान

‘घर घर तिरंगा’ हे राजकीय अभियान मोदी सरकारने सुरू केले. त्या तिरंग्याच्या रक्षणासाठी आजही शेकडो जवानांचे बलिदान सुरूच आहे व दहा वर्षांच्या मोदी काळात तिरंगा जवानांच्या रक्ताने जास्तच भिजला. जम्मू-कश्मीरात रोज आतंकी हल्ले सुरू आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस अतिरेक्यांचा हल्ला झाला व त्यात दोन लष्करी अधिकारी ‘हुतात्मा’ झाले. हे सर्व वेदनादायी आहे आणि लाल किल्ल्यावरील भाषणात आपल्या पंतप्रधानांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नाही. अदानी यांच्या कंपन्यांत ‘सेबी’च्या प्रमुख माधवी बूच यांनी गुंतवणूक केली व या कंपन्या बोगस आहेत. हा घोटाळा हिंडनबर्ग रिसर्चने उघड केला. म्हणजे फौजदारच चोरांचे भागीदार बनले. माधवी बूच व त्यांच्या पतीचे हे सरळ मनी लाण्डरिंग आहे व त्यांची भूमिका अदानींच्या बाबतीत संशयास्पद आहे. तरीही बूचबाई त्यांच्या पदावर कायम व भाजपचे प्रवक्ते टीव्ही वाहिन्यांवर अदानी यांचे रोज समर्थन करीत आहेत. राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते. राहुल गांधी यांनी अदानी-माधवी बूच-हिंडनबर्ग घोटाळ्यावर प्रश्न विचारताच मोदी यांच्या सरकारने राहुल गांधी यांच्या मागे ‘ईडी’चा ससेमिरा पुन्हा लावला, पण माधवी बूच ‘सेबी’च्या प्रमुखपदी कायम आहेत. आपल्या देशातील कायदा किती सडवला आहे त्याचे हे उत्तम उदाहरण. राज्यकर्त्यांचे हात बरबटलेले आहेत. ते आता इतके बरबटले आहेत की, देशाचे सर्व चित्रच त्यामुळे बरबटून गेले. आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली मोदी-शहांचा हस्तक किरीट सोमय्या याने कोट्यवधी रुपये गोळा केले. ते पैसे आपण राजभवनात जमा करू असे लोकांना सांगितले. प्रत्यक्षात त्यातला एक रुपयाही राजभवनात पोहोचला नाही. कोट्यवधी रुपये हडप केले. युद्धनौका विक्रांत भंगारात गेली. हा संरक्षण खात्यातील घोटाळा. त्याची चौकशी सुरू झाली, पण फडणवीस पुन्हा गृहमंत्री होताच त्यांनी हा घोटाळा दाबला व चौकशीच गुंडाळली. ही त्यांची बेगडी देशभक्ती. पोलिसांनी ही चौकशी गुंडाळण्याचा प्रस्ताव मुंबईच्या कोर्टात सादर करताच कोर्ट भडकले व ही चौकशी बंद करता येणार नाही असे पोलिसांना बजावले. गृहमंत्री फडणवीस यांना ही चपराक आहे. भ्रष्टाचाऱ्यांना, देश विकणाऱ्यांना ते पाठीशी घालतात व देशभक्तीच्या खोट्या गप्पा मारतात. विक्रांत युद्धनौका प्रकरणात फडणवीसही उघडे पडले. विक्रांतच्या नावावर जमा केलेले कोट्यवधी रुपये शेवटी गेले कोठे? ते भाजपच्या पक्ष निधीत सामील झाले. अयोध्येत रामाचा लिलाव झाला. रामपथावरील दिवेच चोरीस गेले. मोदींच्या लाडक्या उद्योगपतींनी देश विकायला काढला व मोदींच्या लाडक्या चोरांनी युद्धनौका विक्रांतच्या नावाने कोट्यवधी रुपये जमा केले. या भ्रष्टाचाराचा तपासच महाराष्ट्राचे गृहमंत्री फडणवीस यांनी बंद केला. पुन्हा ‘भारतमाता की जय’ म्हणायला हे मोकळे!

कॅ. दीपक सिंह

या सर्व परिस्थितीत देश उभा आहे तो सामान्य नागरिकांची लढण्याची जिद्द आणि बलिदानासाठी सज्ज असलेल्या आपल्या जवानांमुळे. पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी भाषणे करतात, हिंदू-मुसलमानांत तेढ निर्माण होतील अशा योजनांच्या घोषणा करतात, पण स्वातंत्र्य दिनाच्या आधी चार अतिरेक्यांना कंठस्नान घालून कॅप्टन दीपक सिंह यांनी कश्मीरच्या भूमीवर हौतात्म्य पत्करले. अतिरेक्यांशी समोरासमोर चकमक झाली व कॅप्टन दीपक सिंह यांच्या छातीत गोळी लागली. ते जखमी झाले. त्या अवस्थेतही ते जवानांना सूचना देत राहिले. मोहिमेचे नेतृत्व करीत पुढे निघाले व शेवटी कोसळून पडले. लाल किल्ल्यावरील तिरंगा आज सुरक्षित आहे तो या असंख्य बलिदानांमुळे. पंतप्रधानांची द्वेषपूर्ण भाषणे, अदानी, सेबी व त्यांचे ‘बूच दांपत्य’ यांच्यामुळे नाही!

twitter – @rautsanjay61

Gmail- [email protected]