Sabarmati Express derailed – रेल्वेचं अपघातसत्र सुरुच; साबरमती एक्सप्रेसचे 22 डबे रुळावरून घसरले

देशभरात रेल्वे गाड्यांचे अपघातसत्र सुरुच आहे. उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्यामध्ये शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली. गाडी क्र. 19168 साबरमती एक्सप्रेसचे एकूण 22 डबे रुळावरून घसरले असून कानपूर आणि भीमसेन स्थानकांदरम्यान अडीचच्या रुमारास हा अपघात झाला.

वाराणसीहून अहमदाबादच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या साबरमती एक्सप्रेसचे इंजिन दगडावर आदळल्याची माहिती चालकाने दिली आहे. यामुळे इंजिनच्या कॅटल गार्डचेही नुकसान झाले असून अनेक डबे रुळावरून घसरले. याची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या रेल्वेचे डबे पुन्हा रुळावर आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

झांसी डीव्हीजनचे डीआएम दिपक कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 22 डबे रुळावरून घसरले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनास्थळी रुग्णवाहिलाही तैनात करण्यात आली असून जखमींना जवळच्या रेल्वे स्थानकावर पोहोचण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथे त्यांच्यावर उपचार केले जातील.

दरम्यान, घटनास्थळावरून इतर प्रवाशांना बस किंवा रेल्वेने कानपूर स्थानकापर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आली असून अन्य रेल्वेने त्यांना गंतव्यस्थानी पोहोचवले जाईल, असेही ते म्हणाले. तसेच रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.

आपत्कालीन क्रमांक –

प्रयागराज – 0532-2408128, 0532-2407353
कानपूर – 0512-2323018, 0512-2323015
मिर्झापूर – 054422200097
इटावा – 7525001249
टुंडला – 7392959702
अहमदाबाद – 07922113977
वाराणसी शहर – 8303994411
गोरखपूर – 0551-2208088