आजही 55 हजार नागरिकांसाठी टँकरने पाणीपुरवठा, नगर जिल्हय़ातील 31 गावांत पाणीटंचाईची स्थिती

पावसाळ्याचे दोन महिने जवळपास संपत आले आहेत. मात्र, जिह्यातील काही भागांत  अद्यापि दमदार पाऊस झालेला नाही. दमदार पावसाअभावी जिह्यात 31 गावे आणि 153 वाडय़ावस्त्यांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. टंचाईग्रस्त गावांतील सुमारे 55 हजार नागरिकांची टँकरच्या पाण्यावर तहान भागत आहे.

नगर जिह्याच्या दक्षिण भागातील पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाई जाणवत असते. उत्तर भागातील संगमनेर, कोपरगाव, नेवासे या तालुक्यांतील काही मोजक्या गावांना एप्रिल, मे महिन्यांत हमखास पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने एप्रिल-मे महिन्यांत टँकर सुरू झाले. जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांत पाऊस पडून टँकर कमी होतील, असा अंदाज होता. जिह्यात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. काही तालुक्यांत दमदार पाऊस झालेला नाही. या गावांना पाणीपुरवठा करणारे तलाव कोरडेच आहेत. त्यामुळे 31 गावे आणि 153 वाडय़ांवर पाणीटंचाई जाणवत आहे.

खरिपाच्या सात लाख हेक्टरवर पेरणी; सोयाबीनला सर्वाधिक पसंती!

n जून, जुलै महिन्यांत झालेल्या दमदार पावसाने जिह्यात खरिपाच्या 6 लाख 99 हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, सर्वाधिक 1 लाख 69 हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. नगर जिह्यात 1 जून ते 6 ऑगस्टदरम्यान झालेल्या पावसामुळे खरिपाची पिके जोमात आली आहेत. जिह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या दमदार पावसामुळे 6 लाख 99 हजार 502 हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. यामध्ये सोयाबीनच्या 1 लाख 69 हजार, कपाशीच्या 1 लाख 55 हजार, मकाच्या 77 हजार 700, बाजरीच्या 74 हजार 900, तुरीच्या 74 हजार 733, उडदाची 64 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

नगर जिह्यात सरासरी 331मि.मी. पाऊस

n आतापर्यंत नगर जिह्यात 331 मि.मी. पाऊस झाला असून, सर्वच तालुक्यांत 200 मि.मी.पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. सध्या जिह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. सर्वाधिक जामखेड तालुक्यात 485 मि.मी. पावसाची नोंद झाली. नगर जिह्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने, जिह्यातून वाहणाऱया भीमा, गोदावरी, प्रवरा नदीपात्रांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

टँकरची संख्या 25वर

n सध्या संगमनेर, कोपरगाव, नेवासे, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांत टँकर सुरू आहेत. संगमनेर तालुक्यातील 20 गावांतील 62 वाडय़ा-वस्त्यांवरील 25 हजार नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये टँकरच्या रोज 37 फेऱया अपेक्षित आहेत. कोपरगाव तालुक्यातील 2 गावांतील 15 वाडय़ावस्त्यांवरील 4 हजार 496 नागरिकांसाठी 2 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नेवासे तालुक्यातील 2 गावे, 7 वाडय़ावस्त्यांवरील 2 हजार 605 नागरिकांची तहान टँकरने भागविली जात आहे.

पारनेर तालुक्यात सर्वाधिक टँकर

n पारनेर तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. 6 गावांतील 69 वाडय़ावस्त्यांवर 19 हजार 616 नागरिकांसाठी 6 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर, श्रीगोंदा तालुक्यात एका गावातील 4 हजार 55 नागरिकांची तहान टँकरद्वारे भागवली जाते.