सरकार आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू – सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया, असे आवाहन यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. लोकसभेत महाविकास आघाडीच्या विजयामध्ये आघाडीतील प्रत्येक पक्षाचे योगदान होते, असे म्हणत त्यांनी मित्रपक्षांचे यावेळी आभार मानले.

दिल्लीतील हवा आता बदलली आहे. विरोधी पक्षात असूनही आम्ही सत्ताधारी असल्याप्रमाणे तिथे वागतोय आणि सत्तेत बसलेले जिंकून हरल्यासारखे बसले आहेत, असे सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. हेच वातावरण आता महाराष्ट्रातही आणायचे आहे, असे त्यांनी पदाधिकाऱयांना सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी लाडकी बहीण योजनेवरून अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. बहिणीचे नाते आमच्या भावाला कळलेच नाही, प्रेमात पैसे आले की ते नाते होत नाही, बहिणीचे नाते दीड हजार रुपयात विकत घेता येत नाही, असे त्या म्हणाल्या. महायुतीचे नाते फक्त मतांशी आहे, बहिणींशी नाही, असे त्या म्हणाल्या. गलिच्छ राजकारणात नातं येईल असे कधी वाटले नव्हते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पक्ष आणि चिन्हासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली लढाई ही मशाल किंवा तुतारीची नाही तर तत्त्वाची आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सर्वोच्च न्यायालयाची लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही असा शब्द आपण उद्धव ठाकरे यांची बहीण म्हणून देतो, असेही त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जनता ठरवणार -जयंत पाटील

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही या मेळाव्यात भाषण केले. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा व्यासपीठावर बसलेले नेते ठरवणार नाहीत तर खालची जनता ठरवणार, असे ते म्हणाले. लोकसभेच्या विजयामध्ये शेकापसारख्या छोटय़ा पक्षांचे योगदान आहे आणि विधानसभेच्या काही जागांमध्येही आमचा वाटा आहे, असे सांगत जयंत पाटील यांनी यावेळी शेकापही विधानसभेसाठी आग्रही आहे, असे अप्रत्यक्षपणे सांगितले. आमच्यासारख्या छोटय़ा पक्षांनी लोकसभेच्या काळात केलेल्या कामगिरीची आठवण ठेवा, अशीही विनंतीही त्यांनी केली.