केंद्र आणि राज्य शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाला राजूर ग्रामपंचायतीने हरताळ फासला असून, जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला तिलांजली दिली. आदेशाप्रमाणे 13 व 14 ऑगस्टला ग्रामपंचायतीसमोर राष्ट्रध्वज फडकाविला नसल्याचे उघड झाले असून, हा शासनाच्या आदेशाचा, राष्ट्रध्वजाचा अपमान आहे, असा आरोप करीत ग्रामसेवकासह पदाधिकाऱयांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
राज्य सरकारने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्याचे आदेश दिले होते. नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ आणि जिल्हा परिषदेचे सीईओ आशीष येरेकर यांनी तसे आदेश दिले होते. त्यामध्ये 13 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये गावातील सर्व घरांवर, शासकीय-निमशासकीय कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकविण्यात यावा. तसेच ध्वजासोबत सेल्फी काढून सहभाग नोंदविण्यात यावा, असे सुचविले होते. सेल्फी व फोटो शासनाच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी अपलोड करण्यात यावेत, असेही बजाविले होते.
राजूर ग्रामपंचायतीने 13 व 14 ऑगस्टला तिरंगा फडकविला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जबाबदार असणाऱया संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष मुर्तडक व भारतीय मीडिया फाऊंडेशन यांनी केली आहे. भारतीय मीडिया फाऊंडेशनच्या निवेदनावर रोहिदास लहामगे, राहुल मुर्तडक, गोरख हेकरे, अपेक्षित पवार, संतोष मुर्तडक आदींच्या स्वाक्षऱया आहेत.
या संदर्भात अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चौरे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.