मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते आपल्या खात्यात जमा झाले म्हणून आज शहरासह तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकेच्या दारात महिलांची गर्दी उसळली. मात्र ठराविकच महिलांना पैसे मिळाल्याने भीक नको पण कुत्र आवर असे म्हणण्याची वेळ अनेक महिलांवर आली. मोठा गाजावाजा करत लाडकी बहीण योजना शासनाने जाहीर केली मात्र ती करताना या योजनेचे ज्या पद्धतीने नियोजन करणे गरजेचे होते ते न केल्याने आज तरी पहिल्याच दिवशी या योजनेचा फज्जा उडाला असल्याचे पाहावयास मिळाले.
शुक्रवार सकाळ पासूनच महिलांची मोठी गर्दी बँकांच्या बाहेर जमा व्हायला सुरवात झाल्याने बँकेत ग्राहकांना पाय ठेवायला जागा न उरल्याने लाभार्थी महिलांना रांगा लावण्यास सांगण्यात आले. गुरुवारी स्वतंत्र दिनाची सुट्टी असल्याने आज इतर ग्राहकांची सुद्धा बँकेत मोठी गर्दी जमा झाली होती. नियमित येणाऱ्या ग्राहकांचे काम करायचे की आजच बँकेत आलेल्या लाभार्थी महिलांचे काम करायचे असा प्रश्न बँकेच्या प्रशासनाला पडला. अनेक बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कालच्या स्वतंत्रदिनाला दोन दिवसाची सुट्टी टाकून परगावी जाणे पसंद केल्याने बँकात कर्मचारी व अधिकाऱ्यांची वानवा जाणवली. ज्या महिलांचे बँक खाते आधारकार्डशी लिंक झाले नाही त्यांना सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसे आले असल्याचे मेसेज आल्याने त्या लाभार्थी महिला सुद्धा बँकेत गेल्या व रांगेत उभ्या राहिल्या मात्र ऐनवेळी तुमचे खाते आधारकार्डशी लिंक नसल्याने पैसे मिळणार नाही असे सांगण्यात आल्याने अनेक महिलांचा हिरमोड झाला.
बँकेच्या मधल्या सुट्टीच्या काळात सुद्धा जेवणासाठी सुद्धा बाहेर पडता येत नसल्याने बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. काही महिला साडेपाच वाजले तरीही बँकेच्या दारात ताटकळत उभ्या राहिल्या मात्र वेळ संपल्याने तुम्हाला पैसे मिळणार नाही असे सांगण्यात आल्याने आता उद्या पुन्हा या महिलांवर बँकेच्या दारात उभे राहण्याची वेळी आली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी बँकेत एखादा स्वतंत्र कक्ष स्थापन करावा अशी मागणी आता महिलांमधून होत आहे.