
आर्मीमध्ये नोकरीचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक करणार्या आरोपीस भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर, पोहेकॉ संदीप घोडके, दीपक शिंदे, रवी टकले, मिसाळ, प्रमोद लहारे यांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी की, सन 2023 मध्ये विजय बीस्ट (रा. वाकोडी फाटा, ता. नगर) याने आर्मीमध्ये सिव्हील डिफेन्स, एम.टी.एस. कुक, क्लर्कमध्ये भरती करतो. माझी लष्करातील वरिष्ठ अधिकार्यांशी ओळख आहे, असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन करुन नोकरीस लावतो, असे म्हणून 2 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. तसेच उत्तराखंड, पंजाब व नगर येथील सौरभ पटवाल, मयंक राऊत व लक्ष्मी थापा यांनाही नोकरीस लावुन देतो, असे म्हणून त्यांच्याकडून 8 लाख 30 हजार रुपये घेऊन फसवणूक केली आहे. तसेच त्यांची नगर येथील एका रूग्णालयात बनावट वैद्यकीय तपासणी केली आहे. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पुढील तपास पोहेकॉ मिसाळ हे करत आहेत.