भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले 2 नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप युतीचा पराभव करून मोदी-शहांचे हे एटीएम बंद करू आणि महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातील जनतेसाठीच वापरू, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.महाविकास आघाडीचा पदाधिकारी मेळावा षण्मुखानंद सभागृहात संपन्न झाला, या मेळाव्याला ते संबोधित करत होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याला महत्वाचे स्थान आहे, सत्तापक्ष व विरोधपक्ष ही लोकशाहीची 2 चाके आहेत. पण स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना योग्य स्थान दिले नाही, हा लोकशाहीचा खून आहे. भाजपामध्ये सत्तेची घमेंड व गर्व अजून आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ही अहंकारी प्रवृत्ती सत्तेतून बाहेर काढली पाहिजे.