महाविकास आघाडीत खेळीमेळीचं वातावरण आहे. सगळ्यांवर एकामेकांचं प्रेम आणि विश्वास आहे. ही ताकद आणि एकजूट आपल्याला लोकसभेत दिसली, तीच पुन्हा एकदा विधानसभेतही दाखवायची आहे, असे शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीत आपण जिंकून दाखवलेलं आहे. आणि हा आपला मोठा विजय आहे. जी भाजपा 400 पार चा नारा देत होती. जे एग्झिट पोल कमीत कमी 350 हे आकडे दाखवत होते. त्यांना 303 वरून देशाने 240 वर खेचलेलं आहे, इथेच महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीचा विजय झालेला आहे. भाजपाचं आज बहुमताचं सरकार असतं तर प्रत्येकाच्या घरावर बुलडोजर आला असता. जो काही आवाज देशाच्या जनतेला मिळालेला आहे, तो राहीला नसता. आज आतापर्यंत या एका महिन्यात भाजपने संविधान बदलून स्वतःचं पक्षाचं संविधान जे आहे ते आपल्यावर लादलं असतं, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आणि देशात आपला मोठा विजय झाला. पण ही निवडणूक झाल्यानंतर भाजपवाले आणि मिंधे सरकारमधील लोक, फुटलेली राष्ट्रवादीमधील सांगायला लागले की, तुम्ही फेक नरेटिव्हवर बोलत होतात. मी त्यांना सांगतो, संविधान बदलणार होतं, हे फेक नरेटिव्ह नव्हतं. देशाच्या जनतेलाही माहिती होतं हे फेक नरेटिव्ह नव्हतं. कारण संविधान बदलायची प्रक्रिया त्यांनी महाराष्ट्रातून सुरू केली होती. लोकशाहीला संपवण्याची प्रक्रिया महाराष्ट्रातून त्यांनी सुरू केली होती. दोन वर्षांपूर्वी आपल्यासोबत जे घडलं, एक संविधानिक सरकार बाजूला केलं गेलं. सरकार पाडलं गेलं. खोके घेतले, धोके दिले. जे काही सगळं घडलं ते आपल्या डोळ्यासमोर घडलं. कोण वेश बदलून, कोण हुडी घालून, तर कोण मास्क घालून जात होतं. हे सगळं केल्यानंतर आपल्यातले गद्दार सुरत, गुवाहाटीत डोंगर झाडी बघून मग गोव्यात आले. गोव्यात येवून टेबलावर नाचले. हे सगळं केल्यावर सरकार स्थापन केलं. आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्यायचा, निवडणूक लढायची, जिंकलं तर तुमचं, ही एक लोकशाहीची परंपरा होती. पण ते न करता पक्ष चोरला, पक्षाचं नाव चोरलं, पक्षाचं चिन्ह चोरलं, दोन्ही पक्षांचं तसंच केलं आणि सरकार स्थापन केलं. हे घटनाबाह्य नाही तर काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांनी दिलेल्या संविधानाचा हा अपमान नाही तर काय आहे? लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न नाही तर अजून काय आहे? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी घणाघात केला.
दोन-अडीच वर्षे होत आली. एकही निवडणूक घेण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती आणि प्रयत्नही नव्हता. दीड वर्षे पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झालीच नाही. जे चाळीस चोर पळून गेले होते, त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात त्यांना निवडणुकीला सामोरं जाण्याची हिंमत नव्हती. मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर या महापालिकांमध्ये प्रशासक बवसलेले आहेत. प्रशासकांमार्फत लूट चालवली आहे. तिथे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याची हिंमतच त्यांच्यात नव्हती. मुंबई विद्यापीठातील सिनेटची निवडणूक अजूनही त्यांनी घेतलेली नाही. कदाचित झाली तर सप्टेंबरमध्ये होईल नाहीतर ती देखील पुढे ढकलण्याचा हे प्रयत्न करत आहेत. कारण यांच्या मनात भीती बसलेली आहे. ही भीती नुसतं महाविकास आघाडीची नाही तर महाराष्ट्राच्या जनतेबद्दलही त्यांच्या मनात बसलेली आहे. हिंमत असेल तर निवडणूक घ्या. तुम्हाला तिथे बसण्याची नैतिक जबाबदारी नाही, राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.
जे सरकार महाराष्ट्राला आमान्य आहे, नापसंत आहे महाराष्ट्राला, जे सरकार नाकारलं लोकसभेत गेलेलं आहे, त्यामुळे तुमची दुसऱ्या निवडणुका घेण्याची हिंमत नाही. थोडी तरी लाज, शरम दाखवा, थोरी तरी हिंमत दाखवा आणि महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आज आमची लढण्याची तयारी आहे आणि जिंकण्याची तयारीही आहे. एवढं तुम्ही जर चांगलं काम केलं असेल, बहिणींसाठी चांगलं काम केलं असेल, शेतकऱ्यांसाठी तुम्ही चांगलं काम केलं असेल, असं तुमच्या मनात असेल कारण तुम्ही काम एवढसं करता आणि भलेमोठे होर्डिंग लावता, होर्डिंगवर जेवढी चांगली कामं आम्हाला दिसतात आज तेवढी खरोखर कामं महाराष्ट्रात झाली असतील तर आज माझं तुम्हाला पुन्हा चॅलेंज आहे, आज विधानसभा बरखास्त करा आणि निवडणुकीला सामोरं या. पण हिंमत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महायुती म्हणजे काय आहे, ना महा आहे, ना युती आहे. कारण एकामेकांच्या फायलींवर सह्या होत नाहीत. आणि महाराष्ट्रासाठी काही केलचं नाही. आणि प्रत्येक दिवस लुटायचा. कारण महाराष्ट्रात पुन्हा आयुष्यात त्यांचं सरकार कधीही येणार नाही, महाराष्ट्र त्यांना येऊ देणार नाही, हे त्यांना माहिती आहे. म्हणून महाराष्ट्राचा जेवढा पैसा, प्रत्येक पैसा लुटू शकतो तेवढं लूट करताहेत. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नागपूर या महापालिकांमधील सगळीकडचे घोटाळे आम्ही समोर आणत आहोत. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात आणि मुंबईत लूट झालेली आहे. किती घोटाळा यांचे लोकांसमोर आणायचे? असा प्रश्न पडतो. फायली देणारे अधिकारीही कंटाळलेत. अधिकारी म्हणात, किती फायली तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या, साहेब तुमचं सरकार लवकर आणा, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला.
पुढचे दोन-चार महिने जे काही खोके सरकारचे उरलेले आहेत, त्यात आपल्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न होईल. महाविकास आघाडीत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. आपल्या धर्मांमध्ये हिंदू-मुस्लिम, शिख आणि इतर कुठल्या धर्मांमध्ये भांडणं आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. समाजा-समाजात मग मराठा आणि ओबीसींमध्ये इतर कुठच्याही समाजात, जातींमध्ये, जिल्ह्यांमध्ये भांडणं निर्माण करण्याचा प्रयत्न होईल, मग आपण भांडणार आहोत का? भाजपा जी घाबरते ती एकजुटीला घाबरते. भाजपा सच्चाईला घाबरते. कारण भाजपाचं इक्वेशन सोपं आहे, कमल किचडमेही खिलता है. आपण या महाराष्ट्रात या चिखलफेकीत अडकणार आहोत की त्याही पुढे जाऊन पुढचा विचार करणार आहोत, हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि म्हणून आपण सर्व एकजुटीने लढायला तयार आहोत का? आपण सगळे या खोके सरकारला हरवायला तयार आहोत का? आपण सगळे आपला नवा महाराष्ट्र घडवायला तयार आहोत का? आपण सगळे महिलांना न्याय द्यायला तयार आहोत का? आपण सगळे महिला सुरक्षा ही खरोखर महाराष्ट्रात अमलात आणण्यास तयार आहोत का? आपण तरुणांना रोजगार द्यायला तयार आहोत का? आपण सगळे आपलं सरकार बनवायला तयार आहोत का? आणि आपण सगळे एकदिलाने आणि एकजुटीने लढायला तयार आहोत का? लढायला तयार असाल तर सर्वांनी दोन्ही हात वर करा आणि आपल्या नेत्यांना आपली ताकद दाखवा, (आदित्य ठाकरे यांनी आवाहन करताच संपूर्ण सभागृहाने हात वर केले) ही जी ताकद आहे, या ताकदीला भाजपा घाबरते. जिथे फूट होते, तिथे भाजपा जिंकते. आपण ठरवायचंय आपण लढणार आणि जिंकणार ते महाराष्ट्र म्हणूनच लढणार आणि जिंकणार, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोश भरला.