‘दलितमित्र’ राजा जाधव यांच्या चरित्रग्रंथाचे उद्या प्रकाशन

‘दलितमित्र’ पुरस्कार विजेते, समाजसेवक आणि बांधकाम व्यावसायिक राजा जाधव यांच्या जीवनावरील ‘दादर ते दादर’ या चरित्रग्रंथाचे प्रकाशन ‘ग्रंथाली’तर्फे  शनिवार, 17 ऑगस्टला निको हॉल, वडाळा येथे संपन्न होणार आहे. दादासाहेब दापोलीकर यांनी या चरित्रग्रंथाचे लेखन केले आहे.

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या हस्ते चरित्रग्रंथाचे प्रकाशन होणार असून साहित्यिक सुमेध वडावाला (रिसबूड) हे प्रमुख पाहुणे असतील.

नालासोपाऱयातील ‘दादर’ मध्ये जन्मलेले राजा जाधव हे त्या परिसरातील कट्टर शिवसैनिक. लहानपणी ते छोटे-मोठे व्यवसाय करीत असत. अंगभूत क्रिकेट काwशल्यामुळे त्यांनी रिझर्व्ह बँकेत शिपायाची नोकरी मिळवली. धैर्य, व्यवसायकौशल्य, लोकसंग्रहकला यांच्या आधारे पुढे त्यांनी बांधकाम व्यवसायात ओळख निर्माण केली.

गरजू विद्यार्थी तसेच आदिवासी पाड्यांना मदत करणे अशी अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली. देशाच्या सर्व भागातून अनेक पुरातन वस्तू आणि पुस्तके जमवून त्यांचे एक समृद्ध असे संग्रहालय नालासोपारा येथे त्यांनी उभे केले. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या राजा जाधव यांची अनोखी  जीवनगाथा तरुण पिढ्य़ांना प्रेरणादायी ठरेल, असे  ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर म्हणाले.