ऑलिम्पियन हॉकीपटू कुलवंतसिंग यांना जीवनगौरव; खार जिमखान्याच्या वतीने 28 क्रीडापटू सन्मानित

खार जिमखान्याच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च दर्जाच्या कामगिरीने महाराष्ट्र आणि पर्यायाने देशाचे नाव उंचावणाऱया आणि खार जिमखान्याचे सदस्य असणाऱया ऑलिम्पियन हॉकीपटू कुलवंतसिंघ अरोरा यांच्यासह विविध खेळांतील 28 क्रीडापटूंना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जिमखान्याने आपल्या जीवनगौरव पुरस्कारांमध्ये 8 जलतरणपटू, 7 बॅडमिंटनपटू, 3 टेनिसपटू, 3 टेबल टेनिस खेळाडू, स्क्वाश, स्नूकर आणि वॉटरपोलो या खेळांतील प्रत्येकी दोन आणि हॉकीमधील एका खेळाडूचा समावेश होता.खार जिमखान्याचे अध्यक्ष विवेक देवनानी ऊर्फ पॉली, उपाध्यक्ष माधवी आशर, खजिनदार विपुल वर्मा, सरचिटणीस सारिका विपुल जैन, तसेच विश्वस्त अमरजितसिंघ चड्ढा आणि अशोक मोहनानी यांच्या हस्ते खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.

जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांमध्ये ऑलिम्पिक रौप्यपदक विजेते हॉकीपटू कुलवंतसिंघ अरोरा यांची उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेत होती. शिवाय माजी बॅडमिंटनपटू अमी घिया-शहा ज्यांनी सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते तसेच 12 वेळा दुहेरीत तर चार वेळा मिश्र दुहेरीत विजेतेपद पटकावले होते. त्या हिंदुस्थानच्या पहिल्या बॅडमिंटनपटू होत्या ज्यांनी आपली सहकारी पंवल ठक्कर यांच्या साथीने एडमंट येथील 1978 च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कांस्य पदक पटकावले होते. माजी बॅडमिंटनपटू संजय शर्मा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्हीलचेअरवरून या सोहळय़ात उपस्थित होते, त्यांनी चार वेळा थॉमस कप स्पर्धेत आणि चार वेळा एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते, शिवाय पाच वर्षे ते हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षकदेखील होते.

जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित खेळाडू
अमी घिया, भूषण याकूत, असिफ परपिया, नंदू नाटेकर, इक्बाल मैंदर्गी, अतुल प्रेमनारायण, संजय शर्मा (सर्व बॅडमिंटन), रोहन गज्जर, असिफ इस्माईल, गौरव नाटेकर (सर्व टेनिस), कश्मिरा पटेल, वर्ष मजुमदार, नंदिनी कुलकर्णी (सर्व टेबल टेनिस), विक्रम मल्होत्रा, मनीष चोटरांनी (दोघेही स्क्वाश), सोनाली रेगे, ऋजुता खाडे, आर्यन माखिजा, नील रॉय, शेण पेड्डार, सिंदूर ठक्कर, अदिती घुमटकर, वरुण दिवगीकर (सर्व जलतरण), भरत मर्चंट, डॉ. शरद शेणॉय (दोघेही वॉटरपोलो), कुलवंत सिंग अरोरा (हॉकी), यासिन मर्चंट, श्याम श्रॉफ (दोघेही स्नूकर).