महिला टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन; बीसीसीआयचे नको रे बाबा

येत्या 3 ते 20 ऑक्टोबरदरम्यान हिंदुस्थानने महिला टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन करावे, असा प्रस्ताव आयसीसीने बीसीसीआयला दिला होता. मात्र बीसीसीआयने तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे श्रीलंका किंवा यूएई हे दोन पर्याय डोळय़ासमोर ठेवत आयसीसीला येत्या 20 ऑगस्टपर्यंत आपला निर्णय जाहीर करावा लागणार आहे. शेवटच्या क्षणी या स्पर्धेसाठी कोणता देश उत्सुकता दाखवेल का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे महिला टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन धोक्यात आले आहे.

पुढील वर्षी हिंदुस्थानात महिलांची वन डे वर्ल्ड कप स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. तरीही आयसीसीने जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना असलेल्या बीसीसीआयला टी-20 वर्ल्ड कप आयोजनाचीही गळ घातली होती, मात्र बीसीसीआयने स्पष्ट शब्दांत आपला नकार कळवला आहे. हा मोसम हिंदुस्थानात पावसाचा असतो. तसेच पुढील वर्षीही हिंदुस्थान महिलांचे वर्ल्ड कप आयोजित करतोय. त्यामुळे सलग दोन वर्ल्ड कपचे आयोजन हिंदुस्थान करत आहे, असा चुकीचा संदेशा आम्हाला कोणालाही द्यायचा नसल्याचे जय शहा यांनी स्पष्ट केले.

बांगलादेशचा हिंदुस्थान दौरा महत्त्वाचा
सध्या बांगलादेशात नवे सरकार अस्तित्वात आले आहे. आम्ही अद्याप त्यांच्याशी संपर्क केलेला नाही, मात्र ते आमच्याशी संपर्क करू शकतात किंवा मीसुद्धा त्यांच्याशी चर्चा करेन. आमच्यासाठी बांगलादेशविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे. सध्या बांगलादेश कठीण परिस्थितीत आहे. तेथील स्थितीही भयंकर आहे. आयसीसीसुद्धा बांगलादेशच्या जागी दुसऱया संघाला यजमानपद देण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे समोर आलेय. त्यामुळे बांगलादेश वगळून आयसीसीची श्रीलंका आणि यूएईकडे वळली आहे.