हिंदुस्थानचा 78 वा स्वातंत्र्यदिन शिवसेनेच्या वतीने आज शिवसेना भवनच्या प्रांगणात मोठय़ा उत्साहात साजरा केला गेला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वज तिरंग्याचे ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली. हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो, अशी प्रार्थना करून तिरंग्याला वंदन करण्यात आले.
शिवसेनेने नेहमीच प्रखर राष्ट्राभिमान जपला आहे. दरवर्षी शिवसेना भवनाच्या प्रांगणात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण करून देशाप्रती आदर व्यक्त केला जातो. आजही स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवसेना भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण सोहळा झाला. रश्मी ठाकरे आणि शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेसुद्धा याप्रसंगी उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांना दोरी ओढून तिरंग्याचे ध्वजारोहण करण्यास सांगितले. त्यानंतर राष्ट्रगीत गायन झाले आणि सर्वांनी तिरंग्याला सलामी दिली.
ध्वजारोहण सोहळ्यासाठी शिवसेना भवनचा परिसर गर्दीने फुलला होता. बालमोहन विद्यामंदिर आणि छबिलदास हायस्कूलमधील विद्यार्थीही या सोहळ्यात सहभागी झाले होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवादही साधला. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई, अॅड. अनिल परब, विधानसभेतील शिवसेना गटनेते अजय चौधरी, उपनेते सचिन अहिर, राजकुमार बाफना, उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माजी महापौर महादेव देवळे, विभागप्रमुख महेश सावंत, आशिष चेंबूरकर, संतोष शिंदे, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, हेमांगी वरळीकर यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शिवसैनिक आणि मोठय़ा संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.