Kolkata Rape Case – देशभरातील वैद्यकीय सेवा कोलमडणार, IMA ने दिली कामबंद आंदोलनाची हाक

कोलकता येथील आरजी. कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवार दि. 17 ऑगस्ट सकाळी 6 वाजल्यापासून ते रविवार दि. 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासांकरीता देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.

या 24 तासांमध्ये सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून नियमित ओपीडी बंद राहतील. तसेच वेकल्पिक शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार नाहीत. देशभरात जिथे जिथे वैद्यकीय सेवा पुरविली जाते तिथे कामबंद आंदोलन केले जाणार आहे. डॉक्टरांना न्याय मिळवूण देण्याकरीता हे आंदोलन केले जाणार असल्याचे आयएमएने जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे.

दरम्यान, फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (FORDA) ने हत्या आणि बलात्कार प्रकरणी सुरू केलेला संप मंगळवारी मागे घेतला होता. मात्र गुरूवारी पुन्हा संप सुरू करत असल्याची घोषणा संस्थेने निवदेनामार्फत केली आहे. संप पुन्हा सुरू करण्याची घोषणा करताना, FORDA ने सांगितले की, आरजी. कर मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे वैद्यकीय समुदायामध्ये निराशा निर्माण झाली आहे. त्यामुळे असंतोष दाखविण्याकरीता पुन्हा संप सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.