
दिल्लीच्या रोहिणी परिसरामध्ये अचानक बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी हरयाणाच्या पंचकूलामध्ये सापडली आहे. धक्कादायक म्हणजे काही दिवसांपूर्वी तिच्या आई-वडिलांनी तिच्या मृतदेहाची ओळख पटवली होती. त्यावेळी मृतदेह हा आपल्या मुलीचा असल्याचे सांगितले होते. मात्र आता ती जीवंत सापडली असून पोलिसांनी तिला सुखरुप तिच्या आई-वडिलांकडे सोपवले आहे.
पोलीस उपायुक्त गुरिकबाल सिंग सिद्धू यांनी माहिती दिली. 18 जुलै रोजी तक्रारदार राकेश कुमार यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांची 16 वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस पथकाने जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि बेपत्ता मुलीचे नातेवाईक, मित्र आणि कुटुंबीयांची चौकशी केली.
एवढे करूनही मुलीचा शोध लागला नाही. 9 ऑगस्ट रोजी संभळ येथे एका मुलीचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली होती. दुसऱ्या दिवशी पोलिसांचे पथक मुलीच्या आई-वडिलांना घेऊन तिथे पोहोचले. त्यांनी तो मृतदेह आपल्या मुलीचाच असल्याची ओळख पटवली होती. मात्र पोलिसांना संशयास्पद वाटले. त्यामुळे त्यांनी अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी वैज्ञानिक पुरावे गोळा करण्याचा निर्णय घेतला.
ज्या मुलीचा मृतदेह सापडला ती रोहिणी दिल्ली येथील नसल्याचे पोलीस तपासात सिद्ध झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. यावेळी पोलीस पथकाला बेपत्ता मुलीची माहिती मिळाली. हरियाणातील पंचकुलामध्ये ती मुलगी सापडली. पोलिसांनी तेथे जाऊन मुलीला ताब्यात घेतले. डीसीपी म्हणाले की, मुलीला सुरक्षितपणे तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.