स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राहुल गांधी यांचा अपमान! मागच्या रांगेत बसवल्याने काँग्रेस संतप्त

दिल्लीत लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाचा सोहळा झाला. या सोहळ्यातला लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचा फोटो व्हायरल होत आहे. राहुल गांधी यांना या सोहळ्यात ऑलिम्पिकपदक विजेत्यांसोबत मागच्या रांगेत बसवण्यात आले. यामुळे सवाल उपस्थित करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही यावरून जोरदार चर्चा रंगली. केंद्रातील मोदी सरकारने स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात विरोधी पक्षनेत्याचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसनेही संताप व्यक्त केला असून मोदी सरकारला सवाल केला आहे.

राहुल गांधी बसलेत त्या पुढील रांगेत ऑलिम्पिकपदक विजेत्यांना बसवल्याचे दिसून येत आहे. तसेच राहुल गांधी ज्या रांगेत बसलेत त्या रांगेत हॉकी टीममधील काही खेळाडू बसलेले दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या पाठिमागे आणखी दोन रांगा आहेत, तिथे पाहुण्यांना बसवण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे 10 वर्षांनंतर पहिल्यादांच स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला विरोधी पक्षनेता उपस्थित होता. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याला मागच्या रांगेत बसवल्याने सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केली जात आहे.

काँग्रेसचा सरकारला थेट सवाल

स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यातही राजकारण करण्यात आले, असे म्हणत काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संरक्षण मंत्रालय इतके वाईट वर्तन का करत आहे? लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सोहळ्यात चौथ्या रांगेत बसवण्यात आले. विरोधी पक्षनेत्याचे पद हे कुठल्याही केंद्रीय मंत्र्याहून मोठे असते. लोकसभेत पंतप्रधानांनंतर विरोधी पक्षनेता असतो. राजनाथ सिंहजी, संरक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय सोहळ्यात राजकारण करण्याची परवानगी तुम्ही कशी काय देऊ शकतात? तुमच्याकडून ही आपेक्षा नव्हती, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसच्या आरोपांवर सरकारचे स्पष्टीकरण

ऑलिम्पिकपदक विजेत्यांना बसण्यासाठी पुढची रांग अलॉट केल्यामुळे राहुल गांधी यांना मागच्या रांगेत बसवावे लागले, असे स्पष्टीकरण संरक्षण मंत्रालयाने दिले आहे. स्वातंत्र्य दिनाचा सोहळा आयोजित करण्याची आणि आसन व्यवस्थेची जबाबदारी ही संरक्षण मंत्रालयाची असते.

काही जण बळजबरीने आपले विचार देशावर लादत आहेत… काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

काय सांगतो प्रोटोकॉल?

लोकसभा विरोधी पक्षनेत्याला कायम पहिल्या रांगेत स्थान दिले जाते. यावेळी पहिल्या रांगेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन, शिवराज सिंह चौहान, अमित शहा आणि एस. जयशंकर बसले होते.