‘आता मला बारामतीतून निवडणूक लढण्यात रस नाही’, अजित पवारांनी दिले मुलाला रिंगणात उतरवण्याचे संकेत

लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रातील बारामती मतदारसंघाची निवडणूक लक्षवेधक झाली. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना तिकीट दिले होते. नणंद-भावजयच्या या लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली, तर सुनेत्रा पवार यांना मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नसल्याचे समोर आले आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघातून मुलगा जय पवार यांना रिंगणात उरवण्याचे संकेत दिले आहेत. जय पवार यांच्या उमेदवारीची कार्यकर्त्यांकडून मागणी होत असेल तर त्याबाबत आमच्या पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल, असे अजित पवार म्हणाले.

महायुतीत विधानसभा जागा वाटपावरून कलगीतुरा; पिंपरी विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा

जय पवार यांच्या उमेदवारीची मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जात आहे. त्यामुळे बारामतीतून त्यांना उमेदवारी देणार का? असा सवाल केला असता अजित पवार म्हणाले की, ‘ठीक आहे, देऊया. शेवटी लोकशाही आहे. मला तर फार काही रस नाही. कारण मी 7-8 वेळा निवडणुका लढलो आहे. जनतेचा तसा कल असेल आणि कार्यकर्त्यांची मागणी असेल तर संसदीय मंडळाच्या बैठकीत जय पवार यांच्या उमेदवारीबाबत विचार केला जाईल.’

युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार सामना?

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पाडली आणि आमदारांना घेऊन सत्तेची वाट निवडली. मिंधे सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाले आणि अर्थमंत्री खातेही त्यांच्या वाट्याला आले. या फुटीनंतर अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारातही ते उतरले. लोकसभेच्या निलाकालानंतर ते अधिक जोमाने कामाला लागले आणि मतदारसंघ पिंजून काढू लागले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बारामती विधानसभा मतदारसंघात त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही जय पवार यांना मैदानात उतरवण्याचे संकेत दिल्याने आगामी निवडणुकीत युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार असा सामना पहायला मिळू शकतो.