अदानींना मुंबईतील आणखी दोन मोठे भूखंड देण्याची तयारी; संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत नगरविकास खात्याच्या फाईलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खटके उडाले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. हे तीन टोळ्यातील गँगवॉर आहे. तीन गँग एकत्र येऊन सत्ता चालवतात. मुंबईत अंडरवर्ल्डच्या माध्यमातून गँग चालवल्या जात होत्या. या गँग लुटपाट करायच्या. त्याप्रमाणे महाराष्ट्राचे सरकार तीन गँग चालवत असून त्यामाध्यमातून आपापल्या लोकांशी दिवाळी केली जाते, असा आरोप राऊत यांनी केला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी या गँगने अदानी यांना मुंबईतील 20 भूखंड आधीच दिलेले आहेत. आता आणखी दोन मोठे भूखंड दिले जात आहेत. यातील एक भूखंड कांजूर येथील तर दुसरा मुंबई शहरातील आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली 22 बहुमुल्य भूखंड लुटले जात आहेत. महाराष्ट्रात तीन गँगचे सरकार असल्यानेच आपापल्या लोकांना असे भूखंड वाटले जात आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, पूर्वी मुंबईत अंडरवर्ल्डचा दबाव असताना लँड माफिया निर्माण झाले होते. आज धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून या गँगचे लाडके उद्योपगती लँडग्रॅबिंग करत आहेत. आणखी दोन भूखंड त्यांच्या नावावर जात असतील तर कोणत्याही परिस्थितीत शिवसेना या प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला. तसेच तीन टोळ्यांमध्ये गँगवॉर पेटलेले आहे. फडणवीस आणि मिध्यांच्या गँगमध्ये जास्त वॉर असून तिसरी गँग आल्याने हे आणखी पेटले आहे, असेही राऊत म्हणाले.

बहुमत गमावलेल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला; संजय राऊत यांचा घणाघात

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून काही महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली. ही अशी हप्तेबाजी कितीही झाली तरी हे सरकारी पैसे असून याचा लाभ महाराष्ट्रातील लाभार्थींनी घ्यायला पाहिजे. हे कोणाच्या खिशातील पैसे नाहीत. पण मतांसाठी निर्माण केलेली योजना दोन महिन्यांनी सरकार जातात बंद होऊल आणि आम्ही नव्या स्वरुपात या योजनेचे पुनर्जीवन करू, असा विश्वास राऊत यांनी दिला.

दरम्यान, पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी आणि स्वातंत्र्यदिनी ‘ठाकरे-2’ सरकारमधील मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, आम्ही शिवसेना भवनावर नेहमीच तिरंगा फडकवतो. आमची विचारधारा तिरंगा न फटकवण्याची कधीच नव्हती. ज्यांची होती ते आज महाराष्ट्रात आणि देशात सत्तेत आहेत. त्यांच्या बरोबर एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतून फुटून गेलेले लोक बसलेले आहेत. आम्ही तिरंग्याचा नेहमीच सन्मान केला आणि बलिदान दिले. पुढच्या वर्षी मंत्रालयाच्या आवारात जो सोहळा होईल त्यात ‘ठाकरे-2’ सरकारचा मुख्यमंत्री तिरंगा फडकवेल, असे राऊत म्हणाले.

काही जण बळजबरीने आपले विचार देशावर लादत आहेत… काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा