केवळ राजकीय सूडापोटी माझ्यावर खोटे आरोप केले गेले. खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले. याबाबत मी श्वेतपत्रिका काढणार आहे आणि ज्यांनी मला हकनाक तुरुंगात टाकले, त्या सत्ताधाऱ्यांची व पोलीस, प्रशासनाची व्याजासह परतफेड करीन, असा इशारा शिवसेना उपनेते अद्वय हिरे यांनी दिला.
मालेगावातील रेणुका देवी सहकारी सूत गिरणीसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या साडेसात कोटी रुपयांच्या कर्जाची रक्कम थकविल्याप्रकरणी राजकीय दबावातून अद्वय हिरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऊ महिन्यांपासून ते तुरुंगात होते. सोमवारी, 12 ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. बुधवारी त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. नाशिक व मालेगावातून आलेल्या असंख्य शिवसैनिकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, सहसंपर्पप्रमुख दत्ता गायकवाड, ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यावेळी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्याकडून विचारपूस
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अद्वय हिरे यांना फोन करून विचारपूस केली, त्यांच्याशी चर्चा केली. शिवसेना कायम आपल्या पाठीशी असल्याचे सांगितले.