जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. देशात स्वातंत्र्य दिनाची तयारी सुरू असतानाच आज डोडा जिह्यातील शिवगढ असारच्या जंगलात दहशतवाद्यांच्या गोळीबारात हिंदुस्थानी लष्करातील कॅप्टन दीपक सिंह शहीद झाले आहेत. जवानांच्या प्रतिहल्ल्यात एका दहशतवाद्याचा खात्मा झाला असून तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. चकमक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
डोडातील शिवगढ-असार भागातील घनदाट जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांच्या मागावर असलेल्या पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त सुरक्षा पथकावर आज सकाळीच हल्ला झाला. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात या पथकाचे नेतृत्व करणारे 48 राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन दीपक सिंह हे गंभीर जखमी झाले. लष्करी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे लष्कराकडून सांगण्यात आले. या चकमकीत एक स्थानिक नागरिकही जखमी झाला आहे.
11 जून ते 14 ऑगस्ट या कालावधीत एकटय़ा डोडा जिह्यात सहा दहशतवादी हल्ले झाले आहेत. गेला महिनाभरातील हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 15 जुलै रोजी रात्री 9 वाजता देसा वन परिसरात दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत 10 राष्ट्रीय रायफल्सचे पॅप्टन ब्रिजेश थापा या तरुण अधिकाऱ्यासह 5 जवान शहीद झाले होते. यात एक पोलीसही होता.
अखेर बैठक घेतली
आजच्या हल्ल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत एक बैठक बोलावली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि सुरक्षा यंत्रणांचे प्रमुख यात सहभागी झाले होते.
हाय अलर्ट जारी
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-कश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मूत लष्कराचे तीन हजारहून अधिक जवान आणि दोन हजार बीएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आसाम रायफल्सचे सुमारे दीड ते दोन हजार सैनिकही तैनात केले जात आहेत.
पाच महिन्यांत 83 हल्ले
जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी कारवाया कमी झाल्याचा पेंद्रातील मोदी सरकारचा दावा ाह्ल ठरला आहे. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत आतापर्यंत दहशतवादी हल्ल्याच्या तब्बल 83 घटना घडल्या असून 20 जवान शहीद तर 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
असारच्या जंगलात अद्यापही गोळीबार सुरू आहे. चकमकीत एक दहशतवादी मारला गेला असून एके 47 तिथे मिळाली आहे. याशिवाय रक्ताने माखलेल्या चार रकसॅक, दारूगोळय़ाच्या तीन पिशव्या, अमेरिकन एम-4 रायफल जवानांनी ताब्यात घेतल्या.