सामना अग्रलेख – खऱ्या स्वातंत्र्याच्या शोधात…

आज आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत, परंतु देशातील जनता खऱ्या स्वातंत्र्याच्या शोधातच आहे. विरोधक, टीकाकार आणि लोकशाहीच्या चार खांबांचे घटनात्मक हक्क गजाआड केंद्रीय तपास यंत्रणांना अनिर्बंध स्वातंत्र्य अशी सध्या देशाची स्थिती आहे. तरी बरं, ‘चार सौ पारचा नारा देशातील जनतेनेच लोकसभा निवडणुकीत हाणून पाडला. विचारपूर्वक मतदान केले. खऱ्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक खंबीर पाऊल टाकले. त्यामुळे आजसंविधानाचे स्वातंत्र्यटिकून आहे. अर्थात, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आता सापडलेला मार्ग सोडता त्यावरूनच वाटचाल करण्याचा संकल्प जनतेने आजच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने करायला हवा.

देशभरात आज 78 वा स्वातंत्र्य दिन नेहमीच्या उत्साहात साजरा होईल. स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या रक्तरंजित संघर्षातून आपल्या देशाला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. हजारो ज्ञात-अज्ञात वीरांनी त्यासाठी बलिदान दिले, सर्वस्वाचा होम केला. अशा सर्व वीरांचे, त्यांच्या त्यागाचे पुण्यस्मरण म्हणजे दरवर्षी साजरा होणारा स्वातंत्र्य दिन. देशप्रेमाची प्रेरणा नवीन पिढीला देण्याचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन. वर्षानुवर्षे तो साजरा होत आहे. मात्र मागील दहा वर्षांत त्यालाही ‘इव्हेंट’चे स्वरूप आले आहे. कारण सध्याचे सरकार आणि इव्हेंट या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे दिन, कार्यक्रम, घोषणा कुठलीही असो, त्याचा ‘ग्रॅण्ड इव्हेंट’ करायचा प्रयत्न सतत सुरू असतो. दोन वर्षांपूर्वी साजरा झालेला स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सव’देखील त्यातून सुटला नाही. वास्तविक देशप्रेम आणि ते व्यक्त करणे ही काही इव्हेंटची गोष्ट नाही. जनतेच्या मनात  देशाबद्दल भरपूर प्रेम आहे. दरवर्षीचा स्वातंत्र्य दिन ती आपल्या परीने उत्साहातच साजरा करीत असते. त्यामुळे त्याचा इव्हेंट कशासाठी? मुळात ज्या गोष्टींसाठी 77 वर्षांपूर्वी आपण हे स्वातंत्र्य मिळवले त्या गोष्टींचे

आजचे वास्तव

काय आहे? स्वातंत्र्याचा उद्देश साडेसात दशकांनंतर तरी साध्य झाला आहे का? साध्य झाला नसेल तर राज्यकर्ते म्हणून सरकार त्यादृष्टीने काय उपाय करीत आहे? या प्रश्नांची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी द्यायला हवीत. त्यासाठी आत्मचिंतन करायला हवे, परंतु त्याऐवजी स्वातंत्र्य दिनालाही ‘इव्हेंट’ बनवून त्यात सर्वसामान्यांना गुंगवून आणि गुंतवून टाकायचेच उद्योग सुरू आहेत. ‘हर घर तिरंगा’ या अभियानाला आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु त्या घरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना स्वातंत्र्याचा लाभ मिळत आहे का? मिळत असेल तर किती? की त्यांच्यापासून खरे स्वातंत्र्य आजही कोसो दूर आहे? मागील साडेसात दशकांत देशाची जी प्रगती झाली तिचा लाभ शेवटच्या व्यक्तीच्या पदरात खरंच पडत आहे का? असे अनेक प्रश्न 78 व्या स्वातंत्र्य दिनीही अनुत्तरितच राहणार असतील तर कसे चालेल? ज्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यायची आणि स्वातंत्र्याचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत कसा पोहोचविता येईल याचा प्रयत्न करायचा ते राज्यकर्तेच या प्रश्नांना बगल देत आहेत. देशाचा विकास स्वातंत्र्योत्तर काळात नव्हे तर 2014 नंतर झाला अशा वल्गना करीत आहेत. आज आपण 78 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत, परंतु देशातील जनता खऱ्या स्वातंत्र्याच्या शोधातच आहे. कारण त्याऐवजी तिच्यावर

भलत्याच गोष्टी

लादल्या जात आहेत. कथित राष्ट्रवाद आणि धर्मवादाचा भडका उडवून देशातील परंपरागत धार्मिक स्वातंत्र्य आणि सलोख्याला चूड लावली जात आहे. सर्वधर्मसमभाव या मूळ तत्त्वाला संशयाच्या भोवऱ्यात ढकलण्याचा प्रयत्न होत आहे. सार्वजनिक उपक्रम खासगी उद्योगपतींना विकले जात आहेत. नवीन भांडवलशाहीच्या पंजात जनतेचे आर्थिक स्वातंत्र्य बंदीवान होते की काय, अशी स्थिती आहे. राजकीय विरोधक आणि टीकाकारांचे हक्क व अधिकार केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. विरोधक, टीकाकार आणि लोकशाहीच्या चार खांबांचे घटनात्मक हक्क गजाआड व केंद्रीय तपास यंत्रणांना अनिर्बंध स्वातंत्र्य अशी सध्या देशाची स्थिती आहे. तरी बरं, ‘चार सौ पार’चा नारा देशातील जनतेनेच लोकसभा निवडणुकीत हाणून पाडला. विचारपूर्वक मतदान केले. खऱ्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक खंबीर पाऊल टाकले. त्यामुळे आज ‘संविधानाचे स्वातंत्र्य’ टिकून आहे. नाहीतर तेदेखील धोक्यात आलेच होते. अर्थात, अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आता सापडलेला मार्ग न सोडता त्यावरूनच वाटचाल करण्याचा संकल्प जनतेने आजच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने करायला हवा.