अरे, भावाने एकदा मागितले असते तर पक्ष, चिन्ह सगळं दिलं असतं; सुप्रिया सुळेंचा टोला

बहीणीचे प्रेम काही जणांना समजलेच नाही. ती 1500 रुपयांसाठी तुमच्यावर प्रेम करत नाही. ती मनापासून प्रेम करते. त्यामध्ये पैसे येतच नाहीत. अरे भावाने मागितलं असतं तर सर्व देऊन टाकलं असतं. काय पक्ष आणि चिन्ह.. काहीही मागितलं असतं तरी दिलं असतं. रिकाम्या हाताने आले होते आणि तसंच जाणार आहे. मी काय गाठूड घेऊन जाणार आहे का? भावाने मागून तरी पाहायचं, एकदाही विचार केला नसता, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांना जबरदस्त टोला लगावला. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान तुळजापुरमध्ये त्या बोलत होत्या.

लाडकी बहीण योजना चांगली आहे. सगळी सरकार चांगली कामं करत असतात. योजनेचे टाईमिंग पाहा. सरकारला दोन अडीच वर्ष झाले. यांना कधीच बहीण लाडकी वाटली नाही. लोकसभा निवडणूक झाली की त्यांना बहीण लाडकी वाटू लागली. त्यांना नाते आणि व्यवहारातील फरक समजत नाही. व्यवहारात पैसे असतात. नात्यात प्रेम आणि विश्वास असतो. नात्यामध्ये पैसे येत नाहीत. व्यवहारात प्रेम येत नाही. त्यांनी भावा-बहीणीच्या नात्याला 1500 रुपयांची किंमत लावली, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. 1500 रुपये दिल्यामुळे आम्ही नात्यात वाहून जाऊ असं यांना वाटतय. हा सरकारचा गैरसमज आहे. त्यांना वाटतं 1500 रुपये दिलं की आमच्यावर कोणताही अन्याय करु शकतात. मात्र, महिला याला भुलणार नाहीत. पवार साहेबांनी सरसकट कर्जमाफी केली. कर्जमाफी राजकीय विषय नव्हता. निवडणुकीसाठी नव्हता. शेतकरी अडचणीत आला होता, त्याला मदतीसाठी कर्जमाफी केली होती. आताचे सरकार सुख-दु:खाचे सरकार नाही, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.