
कोपरगाव जिल्हा परिषदेच्या इयत्ता तिसरी शिकणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यावर डुकराने हल्ला केल्याची घटना तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली आहे. यामध्ये तो जखमी झाला आहे. त्यामुळे गावात संताप पसरला असून महिलांकडून डुकराच्या मालकाला दोन दिवसात डुकरे गावाबाहेर नेण्याची तंबी देण्यात आली आहे.
ही घटना घडत असताना सोनवणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दगड व काठीच्या सहाय्याने या मुलाची सुटका केली. इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या अथर्व योगेश जावळे हा आपल्या शाळेत येण्यासाठी घरून निघाला होता. पाठीवर दप्तर होते. तो आपल्या नादामध्ये शाळेत जात असताना अचानक वाटत आपल्या पिलांसोबत डुक्कर फिरत होते. हे डुक्कर त्याच्या लक्षात आले नाही. पाठीमागून या डुकराने अथर्ववर हल्ला केला. यात अथर्व गंभीर जखमी झाला त्याच्या पाठीवर जखमा झाल्या तर उजवा कान डुकराने अक्षरशः फाडून काढला. हे घडत असताना सोनवणे यांनी कुठलाही विचार न करता डुकराच्या तावडीतून त्याला सोडवले. मात्र अथर्वचा रक्तस्त्राव थांबत नव्हता. त्याला पोहेगाव आरोग्य केंद्रात रुग्णालयात हलवले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नगर किंवा नाशिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी तेथील डॉक्टरांनी सांगितले.
सदर घटनेची माहिती मुख्याध्यापक महेंद्र रहाणे यांना समजल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत त्याच्या कुटुंबाशी चर्चा केली. अंगणवाडी सेविका कांताबाई जावळे व आदी महिलांनी या डुकराच्या मालकाला तेथे बोलवत. ही डुकरे ताबडतोब गावाच्या बाहेर काढण्यासाठी त्याला तंबी दिली. दोन दिवसात जर ही डुकरे गावाच्या बाहेर गेली नाही. तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.