नवी मुंबई विमानतळावर पुन्हा विमानाच्या घिरट्या; टेक ऑफ कधी ते लवकरच कळणार

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा एकदा विमानाने घिरट्या घातल्या आहेत. पावसामुळे रखडलेली सिग्नल यंत्रणेची चाचणी पूर्ण करण्यासाठी सलग दोन दिवस छोटे विमान धावपट्टीवरून समान उडवण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाली असून यासंदर्भातील अहवाल विमानतळ प्राधिकरणाला पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे विमानाचे टेक ऑफ कधी होणार हे लवकरच कळणार आहे. दरम्यान विमानतळावर घिरट्या घालणारे विमान पाहण्यासाठी नवी मुंबई, पनवेल परिसरातील नागरिकांनी मोठया संख्येने गर्दी केली होती.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम एकूण पाच टप्प्यांत होणार आहे. त्यापैकी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे काम सुमारे 65 टक्के पूर्ण झाले. दक्षिण आणि उत्तर बाजूला जाणाऱ्या दोन धावपट्ट्यांचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली आहे. याच सिग्नल यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी 17 जुलै रोजी विमानतळ प्राधिकरणाच्या दोन विमानांनी नवी मुंबई विमानतळावर घिरट्या घातल्या होत्या. ही चाचणी लागोपाठ दोन दिवस होणार होती, मात्र 18 जुलै रोजी दिवसभर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे दुसऱ्या दिवशी होणारी चाचणी 19 जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र 19 जुलै रोजीही दिवसभर पावसाचा जोर कमी न झाल्याने विमानतळ प्राधिकरणाने सिग्नल यंत्रणेची चाचणी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्याने 12 व 13 ऑगस्ट अशी सलग दोन दिवस सिग्नल यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून याचा अहवाल पाठवण्यात आला आहे.

अंतिम परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा

सध्या सुरू असलेल्या चाचणीमध्ये सिग्नल यंत्रणेसह इन्स्ट्रुमेंट लॅण्डिंग सिस्टीमचा समावेश आहे. ही एक अचूक रेडिओ नेव्हिगेशन प्रणाली आहे. ही चाचणी यशस्वी झाल्याने आता धावपट्टीवरील लायटिंग आणि रडार यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर व्यावसायिक विमानाची धावपट्टीवर लॅण्डिगची चाचणी होईल, असे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी सांगितले. दरम्यान यानंतर अंतिम परवाना मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.