अरे देवा! म्हाडाच्या संकेतस्थळाची हुबेहूब नक्कल!! सायबर ठगांच्या प्रतापामुळे प्राधिकरणाची डोकेदुखी वाढली

सायबर ठगांनी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाची हुबेहूब नक्कल करून त्याद्वारे एकाला 50 हजार रुपयांना गंडा घातला आहे. ठगांनी अशा प्रकारे अनेक जणांची फसवणूक केल्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. याप्रकरणी म्हाडाने बनावट संकेतस्थळ निर्माण करणाऱ्यांविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. ऐन म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी सोडत सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडल्याने प्राधिकरणाची डोकेदुखी वाढली आहे.

गोरेगाव येथे म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आश्वासन देत चार अज्ञातांनी एका व्यक्तीला बनावट संकेतस्थळ व त्यावरील उपलब्ध पेमेंट लिंकबाबत माहिती दिली. सुरुवातीला या घराच्या एकूण विक्री किमतीपैकी 50 हजार रुपये या बनावट संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन भरून घेण्यात आले. याच बनावट संकेतस्थळावरून बनावट पावतीदेखील उपलब्ध करून दिली. संशय आल्याने या व्यक्तीने म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यावेळी सदर व्यक्तीने म्हाडाच्या संकेतस्थळासारख्या हुबेहूब दिसणाऱ्या बनावट संकेतस्थळावर पैसे भरल्याचे लक्षात आले.

तीच रंगसंगती, तशीच रचना

सायबर ठगांनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे हुबेहूब बनावट संकेतस्थळ mhada.org या नावे तयार केले आहे. बनावट संकेतस्थळाचे होम पेज, पत्ता व पहिल्या पानावरील रचना सेम टू सेम म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळासारखीच आहे, मात्र या बनावट संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया न राबविता थेट पेमेंटचा पर्याय उपलब्ध आहे.

म्हाडाने दिला सावधानतेचा इशारा

म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. केवळ संगणकीय सोडतीच्या माध्यमातूनच म्हाडातर्फे घरांचे वितरण केले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे घरांचे वितरण केले जात नाही, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केले आहे.