शिवसेनेच्या खांद्यावर बसून दिल्लीत गेलेले लाथा मारत असतील तर तंगडी धरून खाली खेचा!
मराठी माणसाने संघर्ष करून मुंबई मिळवली. त्याच मुंबईतून त्याला उपरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या काळात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कुंचल्याचा पलिता केला होता, तशीच आज कुंचल्याची मशाल झाली आहे. शिवसेनेने ही मशाल उगीच घेतलेली नाही. आज आपलीच मुंबई आपल्याला उपरी होणार असेल तर दिल्लीत बसलेल्या दोन महाराष्ट्रद्वेष्टय़ांच्या बुडाला शिवसेनेच्या मशालीची धग लावावीच लागेल, अशी गर्जना करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शरसंधान केले.
साप्ताहिक ‘मार्मिक’चा 64 वा दिमाखदार वर्धापन दिन सोहळा आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर सभागृहात पार पडला. या सोहळय़ाला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रद्वेष्टय़ा भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचा चांगलाच समाचार घेतला.
मुंबई व महाराष्ट्राचे द्वेष्टे शिवसेनेचा वापर करून, शिवसेनेच्या खांद्यावर बसून दिल्लीत गेले आणि आज शिवसेनेलाच लाथा घालण्याची भाषा करत असतील तर त्यांचे तंगडे पकडून बाजूला फेका, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यावेळी भारतीय जनता पक्षावर तुटून पडले. मुंबई आणि महाराष्ट्राच्या द्वेष्टय़ांना बाजूला फेकायचे की नाही असे त्यांनी विचारताच संपूर्ण सभागृहात एकमुखी होकार दुमदुमला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेना आणि ‘मार्मिक’च्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. त्यानंतरही मराठी माणसावर अन्याय सुरू राहिला. कारखान्यांमध्ये परप्रांतीयांची भरती जास्त होती. मुंबई मिळवूनही मराठी माणसाला नोकरी मिळत नव्हती. मराठी माणूस मुंबई सोडून जायला लागला होता. कर्मचाऱ्यांच्या याद्या आणि टेलिफोन डिरेक्टरीत मराठी माणसाचा पत्ताच नव्हता. ‘मार्मिक’मधून त्या याद्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. वाचा आणि थंड बसा म्हणत बाळासाहेबांनी मराठी माणसाला जागृत केले, अशा आठवणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या.
प्रत्येक पानात आयुष्य जगण्याचे मार्गदर्शन
‘मार्मिक’चे वर्धापन दिन होत राहतील. 64 होतील 65 होतील, 100 होतील, सव्वाशे होतील, दीडशे होतील, पण आपण ‘मार्मिक’ का जपतोय, का वाचतोय, का पुढे घेऊन जातोय. दर आठवडय़ाला येतोय आणि रद्दीमध्ये बरा पडतोय म्हणून नाही तर जगायचे कसे, न्याय्य हक्क म्हणजे काय हे आयुष्याचे मार्गदर्शन त्याच्या प्रत्येक पानामध्ये असते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मार्मिक’ आजही ताजातवाना आणि तरुण
‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांनी ‘मार्मिक’ आणि उद्धव ठाकरे यांचा जन्म एकाच सालातला आहे, असे यावेळी सांगितले होते. तो धागा पकडत उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘मार्मिक’चे वय सांगितले, पण माझे सांगण्याची गरज नव्हती आणि सांगितले तरी काही पर्वा नाही. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र म्हणून त्यांच्याकडून काही धडे मी गिरवले आहेत. वय सर्वांचे वाढते, पण माणूस ज्यावेळी मनाने थकतो तेव्हा तो वयस्कर होतो असे बाळासाहेब सांगायचे. माझे मला माहीत नाही, पण ‘मार्मिक’ 64 वर्षांचा झालाय हे कुणीही मानणार नाही. अजूनही तो ताजातवाना आणि तरुण आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
‘मार्मिक’चा प्रवास असाच आहे की ज्यात सर्वांना आपल्या आठवणी भरभरून सांगता येतील. ‘मार्मिक’ हा एक चमत्कार आहे, ‘सामना’ हा एक चमत्कार आहे, शिवसेना हा चमत्कार आहे. ही सगळी किमया एका व्यंगचित्रकाराने आपल्या एका कुंचल्याच्या आधारे केलेली आहे, असे प्रशंसोद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली होती. मराठी माणसाने मुंबई मिळवली होती. आता संघर्ष खूप झाला. थोडे करमणुकीचे क्षणही मराठी माणसाच्या आयुष्यात यावेत यासाठी शिवसेनाप्रमुख आणि श्रीकांत ठाकरे यांनी ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. त्याचे पहिले संपादक द. पां. खांबेटे होते. त्यानंतर प्रमोद नवलकर, पंढरीनाथ सावंत या प्रत्येकाने हा किल्ला समर्थपणाने लढवला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
व्यंगचित्र बघता बघता मी लहानाचा मोठा झालो. ‘मार्मिक’चा आणि माझा जन्म 1960 चा. आज मी ‘मार्मिक’चा संपादक आहे, दैनिक ‘सामना’चा संपादक आहे. तो वारसा किती समर्थपणे मी पुढे नेतोय माहीत नाही. पण सर्व शिवसैनिक संकटातही साथसोबत देताहेत मग मी शत्रूची पर्वा का करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
वर्गणीदार वाढवून ‘मार्मिक’ही चोरून नेतील इतकी लाचारी वाढलीय
‘मार्मिक’चे जास्तीत जास्त वर्गणीदार वाढवा अशा आवाहनावरून उद्धव ठाकरे यांनी यावेळी मिंधे गटावर निशाणा साधला. वर्गणीदार वाढवा म्हणताय, पण आताचा जमाना असा आहे की वर्गणीदार आमच्याकडे जास्त आहेत असे सांगून ‘मार्मिक’ आमचाच आहे असे करण्याचा प्रयत्न कुणीतरी करू शकते, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली. त्याला आधार म्हणून त्यांनी डेस्टिनेशन वेडिंगचे उदाहरण दिले आणि ही कल्पना बाहेर सांगू नका अशी मिश्कीलीही केली. ते म्हणाले की, डेस्टिनेशन वेडिंगमध्ये सर्व हॉटेल आणि तिथले सर्वकाही बुक केले जाते. मग कुणी दावा केला तर की 100 टक्के खोल्या माझ्या नावावर आहेत, आजपासून या हॉटेलचा मालक मी. अशी सगळी लाचारी सध्या सुरू झाली आहे.
दिल्लीतील त्या दोन महाराष्ट्रद्वेष्टय़ांना आपण दोन नावे दिली आहेत, असे उद्धव ठाकरे बोलताच सभागृहातून अहमदशहा अब्दाली, अफझलखान असे आवाज आले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी, आपण व्यंगचित्र काढत नाही, पण शब्दाने बोलतो आणि ते लोकांना पटते, अशी कोटी केली.
प्रत्येक शिवसैनिकाने ‘मार्मिक’ वाचायला हवे – दिवाकर रावते
शिवसेना नेते दिवाकर रावते यांनीही यावेळी ‘मार्मिक’बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. बुवाबाजीवर ‘मार्मिक’ने केलेले प्रहार, प्रभावीपणे मांडलेला आचार्य अत्रे-ठाकरे यांच्यातील शाब्दिक संघर्ष याचे दाखले रावते यांनी दिले. शिवसैनिक ही संकल्पना मुळात ‘मार्मिक’ने मांडली, ‘मार्मिक’ने शिवसैनिकांना संघर्ष शिकवला, त्यामुळे प्रत्येक शिवसैनिकाने ‘मार्मिक’ वाचायला हवे असे आवाहनही रावते यांनी केले. आमच्या पिढीप्रमाणेच ‘मार्मिक’ला पुढच्या पिढय़ा घडवण्याचे सामर्थ्य लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
सत्तेला ललकारण्याची हिंमत फक्त ‘मार्मिक’ने केली – मुकेश माचकर
सर्व प्रसारमाध्यमांचे रूपांतर गेल्या काही काळात गोदी मीडियामध्ये झालेले दिसले. अशा काळात सत्तेला ललकारण्याची हिंमत ‘मार्मिक’ने केली, असे यावेळी ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर म्हणाले. कोरोना काळात वृत्तपत्र व्यवसायाचे कंबरडे मोडले होते. लोकांना नोकरीवरून काढले गेले, पगार कमी केले गेले, पुरवण्या बंद केल्या गेल्या, पण प्रबोधन प्रकाशनने यापैकी काहीही केले नाही. कोरोना काळात सर्वजण माघार घेत असतानाही ‘मार्मिक’ आणि ‘सामना’ लढत होते, असे माचकर म्हणाले.
शिवसेनेच्या स्थापनेचा नारळ माझ्यासमोर फुटला. त्या नारळातून जे शिंतोडे उडाले त्या प्रेमाच्या ओलाव्यातूनच पुढे मी शिवसेना पक्षप्रमुख झालो. याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण जो वैभवशाली वारसा आहे तो घेऊन मी पुढे जातो आहे. या वाटचालीत तुम्ही सगळे माझी साथसोबत देत आहात. अगदी संकटातही तुम्ही माझ्यासोबत उभे आहात. त्यामुळे मी संकटांची पर्वा कशासाठी करू.
शिवसेनेचा खणखणीत आवाज म्हणजे मार्मिक आणि सामना!
उद्धव ठाकरे म्हणाले की, एक ब्रीदवाक्य आहे… खिचो ना कमान को, ना तलवार निकालो; जब तोफ मुकाबिल हो, तो अखबार निकालो… ही वर्तमानपत्राची ताकद आहे. आता गोदी मीडिया आहे ठीक आहे, पण आपल्याकडे एक जरी असला तरी जो आवाज निघेल तो खणखणीत असला पाहिजे आणि शिवसेनेचा खणखणीत आवाज म्हणजे मार्मिक आणि सामना आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. हा केवळ एका साप्ताहिकाचा वर्धापन दिन नाही, तर घेतलेला वारसा आणि वसा यांचा वर्धापन दिन आहे. हा वसा जपा आणि मार्मिकने निर्माण केलेली दुनिया आणखी पुढे न्या, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.
मराठी माणसासाठी पुन्हा ती भाषा वापरावी लागेल
संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतरही मराठी माणसावर अन्याय होऊ लागल्याने शिवसेनेचा जन्म झाला. मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या एअर इंडियाचा सीईओ नंदा याच्या कानाखाली शिवसैनिकांनी आवाज काढला तेव्हा एअर इंडियाची दारे मराठी माणसासाठी उघडली होती. आत्ताही मराठी माणसाला नोकरीत, इमारतीत प्रवेश नाकारल्याचे कानावर येऊ लागले आहे. त्यामुळे पुन्हा ती भाषा वापरावी लागेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला येथे नोकरी मिळणार नाही अशा जाहिराती करण्याचे धाडस करणाऱ्या गुजराती कंपन्यांना दिला.
…हीच मार्मिक आणि शिवसेनेची ताकद
पूर्वी सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठी माणूस नव्हता. आज परिस्थिती बदलली आहे असे सांगताना उद्धव ठाकरे यांनी स्थानीय लोकाधिकार चळवळीचेही कौतुक केले. लोकाधिकार महासंघाचे शिवराय संचलन फोर्ट भागात निघते तेव्हा तेथील सर्व सरकारी कार्यालयांमधील लोकं खिडक्यांमधून बघत असतात. ज्या विभागात मराठी माणसाला एन्ट्री नव्हती तिथे मराठी माणूस दार फोडून आतमध्ये गेला आणि शिवसैनिक कशा गर्जना देताहेत ते खिडकीतून पाहतोय असा विचार त्यावेळी मनात येतो असे सांगतानाच, हीच मार्मिक आणि शिवसेनेची ताकद आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी अभिमान व्यक्त केला.