पावसाळा आणि आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आगमन आणि विसर्जनावेळी बाप्पाला, मंडळांना आणि गणेशभक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी खड्डे, वृक्ष छाटणी, पेव्हर ब्लॉक, सिग्नल व्यवस्था, पंप तसेच ड्रेनेज सिस्टममध्ये तातडीने सुधारणा करा, अशी मागणी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे केली.
शिवडी विधानसभेच्या वतीने पालिकेच्या जी-दक्षिण विभागातील गणेशोत्सव मंडळांच्या समस्यांसंदर्भातील बैठक सहाय्यक आयुक्त मृदुला अंडे यांच्याबरोबर आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, विधिमंडळ गटनेते अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, उपविभागप्रमुख गजानन चव्हाण, गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, स्नेहल आंबेकर, माजी उपमहापौर हेमांगी वरळीकर उपस्थित होते. दरम्यान, अवयवदानासाठी मंडळांसह पालिकेने पुढाकार घ्यावा, अशी मागणी चौधरी यांनी केली.
मोनो रेल्वेचे पिलर ठरताहेत अडथळा
सातरस्ता परिसराजवळील कस्तुरबा रुग्णालयाच्या बाजूला असलेले मोनो रेल्वेचे दोन पिलर हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांच्या विसर्जनात मोठा अडथळा ठरत आहेत. या पिलरबाबत तातडीने निर्णय घेऊन भाविकांना, गणेश मंडळांना दिलासा द्यावा, अशी मागणीही चौधरी यांनी केली. याबाबत एमएमआरडीएकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे अजय चौधरी यांनी सांगितले.