
जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील वरूड बु. येथे बँकेत येणार्या शेतकर्यांना विनाकारण त्रास देणार्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाला आज 13 ऑगस्ट रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मयुर बोर्डे यांनी बँकेत घुसून चोप दिला. वरुड परिसरात प्रचंड खळबळ माजली होती.
गेले काही महिन्यात बँकेत येणार्या शेतकर्यांना विनाकारण त्रास देत अडवणूक केली जात होती. अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मयुर बोर्डे यांच्याकडे अनेक शेतकर्यांनी केल्यानंतर आज 13 ऑगस्ट रोजी मयुर बोर्डे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने बँक ऑफ महाराष्ट्र वरूड शाखेत येथे पोहचले. पिक कर्ज कधी भरणार, केव्हा भरणार, अशी लेखी लिहून द्या यासह अनेक कारणांसाठी अडवणूक करून, निराधार, वयोवृध्द, विधवा, दुधाचे अनुदान, घरकुलाचे अनुदान असे अनेक पेमेंट बँकेत जमा झालेल्या पैशाला व्यवस्थापकाने हॉल्ड लाऊन ठेवले होते. अनेकांना घरगुती अडचणीचा सामना करतांना दवाखान्या,मुलांचे शिक्षण या सारख्या महत्वाच्या कामासाठी पैसे हवे होते. मात्र ते पैसे काढता येत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले होते. यावर जाब विचारण्यासाठी मयुर बोर्डे यांनी बँकेत जाऊन शाखा व्यवस्थापकाला सदरील अडचणीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. शेतकरी अडचणीत असताना व्यवस्थापक सहकार्य करत नसल्याचे लक्षात आल्याने शेतकरी संघटनेचे मयूर बोर्डे यांनी शाखा व्यवस्थापकाला चोप दिला. तर यापुढे शेतकर्यांची पुन्हा अडवणूक केल्यास, सोडणार नाही असा इशारा मयुर बोर्डे यांनी व्यवस्थापकासह बँक कर्मचार्यांना या वेळी इशारा दिला.