कुणी तरी आहे तिथं.. सुधागडमध्ये बिबट्याची दहशत; १० शेळ्या, मेंढ्यांचा फडशा

सुधागड तालुक्यात बिबट्याने दहशत माजवली असून आतापर्यंत १० शेळ्या, मेंढ्या, जनावरे यांचा फडशा पाडला आहे. घोटवडे, वासुंडे, पाली, मानखोरा विभागात बिबट्याचा वावर असल्याने सर्वत्र भीती आहे. दिवसासुद्धा शेतकरी शेतावर जाण्यास घाबरत असून वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
सुधागड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पाळीव प्राण्यांसह भटक्या कुत्र्यांना बिबट्या लक्ष्य करत आहे. रात्र झाली की गावाशेजारील वसाहतीमध्ये बिबट्याचे अनेकदा दर्शन झाले आहे. आतापर्यंत सात ते आठ शेळ्या, मेंढ्या, गाय, म्हैस, वासरू तसेच कित्येक भटकी कुत्री बिबट्याने फस्त केली आहेत. पशुधन धोक्यात आल्याने शेतकरी धास्तावले आहेत. जनावरांना फस्त करणारा बिबट्या शेतकऱ्यांवरही हल्ला करत
असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे.

 शिवसेनेचे निवेदन
काही दिवसांपूर्वी वासुंडे गावात तसेच पाली बैठक हॉलजवळ बिबट्याने सात ते आठ बकऱ्या मारल्या होत्या. यामुळे गावात दहशत आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत यांनी वनाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.