मुंबईचा पाणीसाठा 93 टक्क्यांवर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात तलावांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईच्या पाणीसाठय़ात एक आठवडय़ानंतर आणखी तीन टक्क्यांनी वाढ झाली असून आतापर्यंत 13 लाख 39 हजार 601 दशलक्ष लिटर म्हणजेच 93 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. 2023 साली 11 लाख 91 हजार 565 दशलक्ष मीटर पाणीसाठा म्हणजे आजच्यापेक्षा 10 टक्के कमी पाणीसाठा जमा होता. दरम्यान, मुंबईकरांच्या पाण्याची चिंता आधीच मिटली असली तरी तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे लवकरच 100 टक्के पाणीसाठा पूर्ण होईल, अशी माहिती महापालिकेच्या जलअभियंता विभागाकडून देण्यात आली. तलाव क्षेत्रातील पाणीसाठय़ात वाढ झाल्याने 29 जुलैपासून 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आली होती.