गर्भाशयातील मोठ्या फायब्रॉईडमुळे आई न होऊ शकलेल्या 37 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर सर जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी आज आनंद फुलवला. तिच्या गर्भाशयातून सहा किलो वजनाची गाठ शस्त्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढली गेली. गर्भाशय वाचल्याने आता मी आई होऊ शकते या विचाराने शस्त्रक्रियेनंतर तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले.
गेल्या चार वर्षांपासून नेहाच्या (बदललेले नाव) ओटीपोटात दुखत होते. खासगी रुग्णालयात उपचार करूनही सुधारणा होत नव्हती. गेल्याच वर्षी नेहाचे लग्न झाले. मात्र गर्भधारणा होत नव्हती. चाचण्यानंतर तिच्या गर्भाशयात मोठी फायब्रॉईडची गाठ असल्याचे समजले. खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला गर्भाशयच काढावे लागेल. नेहाने सर जे. जे. रुग्णालयात जाऊन स्त्रीरोग तज्ञ डॉ. अशोक आनंद यांचा सल्ला घेतला.
आठवडाभरापूर्वी ती तपासणीसाठी आली तेव्हा तिचे पोट एखाद्या नऊ महिन्यांच्या गर्भवतीइतके मोठे होते. डॉ. आनंद आणि त्यांच्या टीमने 9 ऑगस्ट रोजी मायोमेक्टॉमी शस्त्रक्रियेद्वारे नेहाच्या गर्भाशयातील गाठ काढली. गर्भाशयाला कोणताही धक्का न लावता डॉक्टरांनी यशस्वीरित्या ही शस्त्रक्रिया केली. पुढील सहा महिन्यांनंतर नेहा गर्भधारणेसाठी फीट होईल, असे डॉ. आनंद यांनी सांगितले.