गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाविरोधात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन अद्याप शमलेले नाही. हिंदूंवर, मंदिरांवर हल्ले सुरूच असून आंदोलकांनी आज 1971च्या युद्धाशी संबंधित राष्ट्रीय स्मारक तोडले. मुजीबनगरमध्ये असलेले हे स्मारक भारत-मुक्तीवाहिनी लष्कराच्या विजयाचे आणि पाकिस्तानी लष्कराच्या पराभवाचे प्रतीक होते. 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल एएके नियाझी यांनी हजारो सैनिकांसह हिंदुस्थानी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले होते. नियाझी यांनी हिंदुस्थानी लष्कराचे ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ लेफ्टनंट जनरल जगजित सिंग अरोरा यांच्यासमोर कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. या क्षणाची प्रतिमा या स्मारकाच्या माध्यमातून कोरण्यात आली होती.
विद्यार्थ्यांमुळे राक्षस निघून गेला…
बांगलादेशात विद्यार्थ्यांनी घडवून आणलेल्या राजकीय खांदेपालटाबाबत अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीने हे घडवून आणले आणि राक्षसही निघून गेला, असे नोबेल पुरस्कार विजेते युनुस यांनी रविवारी सांगितले. तुमच्यामुळे हे सरकार पडले. तुम्हीच मला अंतरिम प्रशासनाचा कार्यभार स्वीकारावा असे आदेश दिले म्हणून मी स्वीकारतो, असे मी विद्यार्थ्यांना सांगितले, असे युनुस म्हणाले. दोन विद्यार्थी आंदोलक – नाहिद इस्लाम आणि आसिफ महमूद हे 16 सदस्यीय सल्लागार समितीचा भाग आहेत. तुमच्यामुळे हा क्षण आला, राक्षस निघून गेला, असे युनूस यांनी शेख हसिना यांच्या देश सोडून जाण्याविषयी सांगितले. यापुढे काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. तुम्ही सुरुवात करता तेव्हा काहींना निर्णय आवडतात, काहींना आवडत नाहीत, पण पुढे जायलाच लागते, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.
बांगलादेशातील हंगामी सरकारने आपल्या देशात कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी ठोस पावले उचलायला हवीत. त्यांच्या देशात मुस्लिम नागरिकांकडून अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत. हिंदू संस्कृती दर्शवणारी केंद्रे, मंदिरे आणि हिंदूंच्या घरांवर होत असलेले हल्ले अत्यंत लज्जास्पद बाब आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
हिंदू, ख्रिश्चन, बौद्धांना संरक्षण द्या
बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांबद्दल काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज अस्वस्थता व्यक्त केली. तेथील हंगामी सरकारने हिंदू, ख्रिश्चन आणि बौद्धांच्या सुरक्षेची खात्री करावी, असे आवाहनही त्यांनी केले. धर्म, जात, भाषा किंवा अस्मितेच्या आधारावर भेदभाव, हिंसाचार आणि हल्ले कोणत्याही सुसंस्कृत समाजात अस्वीकारार्ह आहेत, अशी पोस्ट प्रियांका गांधी यांनी एक्सवर केली आहे. बांगलादेशातील परिस्थिती लवकरच सुरळीत होईल आणि हंगामी सरकार अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची काळजी घेईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.