तुमच्या फुटक्या मतांसाठी घरच्या लक्ष्मीला लाच देता? जितेंद्र आव्हाडांनी फटकारले

अमरावती येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक विधान केले. आमचे सरकार आले नाही तर दिलेले दीड हजार रुपयेही खात्यातून काढून घेऊ, असे धक्कादायक विधान आमदार रवी राणा यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून सध्या त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले आहे.

हा राज्याच्या साध्याभोळ्या महिलांच्या भावनांसोबत खेळ आहे..! बाई ही घरची लक्ष्मी असते. मत दिलंत तरच पैसे देऊ, नाहीतर दिलेत तेही काढून घेऊ असं म्हणत घरच्या लक्ष्मीला पैश्यांचं आमिष दाखवता? तुमच्या फुटक्या मतांसाठी घरच्या लक्ष्मीला लाच देता? या सरकारला लाज वाटायला हवी. माताभगिनींचा एवढा अपमान राज्यात कधीच झाला नव्हता, तेवढा हे सरकार या घाणेरड्या प्रचारात करतंय. लाडकी लाडकी म्हणत ऊतू चाललेल्या बहिणींवरच्या प्रेमाचा आज भांडाफोड झालाय. ना यांचं बहिणीवर प्रेम आहे, ना ही योजना हे सरकार पुढे सुरू ठेवणार आहे. परक्या भावांचा खरा चेहरा यानिमित्ताने समोर आलाय”, अशी टीका आव्हाड यांनी केली.

अमरावती येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये रवी राणा यांनी लाडकी बहीण योजनेबाबत धक्कादायक विधान केले. आमचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेच्या दीड हजारांचे दुप्पट म्हणजेच तीन हजार रुपये करू. पण त्याआधी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. ज्या मला आशीर्वाद देणार नाही त्यांच्या खात्यातून एक भाऊ म्हणून दीड हजार रुपयेही वापस काढून घेऊ, असे विधान रवी राणा यांनी केले. यामुळे संताप व्यक्त होत आहे.

लाडकी बहीण’ योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची लढाई

दरम्यान, महायुती सरकारमध्ये सध्या प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेपेक्षा त्या योजनेचं क्रेडिट घेण्यावरून युद्ध पेटलं आहे. ज्यामुळे महायुतीतील बेबनाव समोर आला आहे. या ‘क्रेडिट वॉर’वर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ यांनी आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यावरून सध्या मिंधे गट श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यावरून या योजनेचे श्रेय कोणाला जाते, असे विचारले असता अजित पवार म्हणाले, ‘महायुती सरकारने ही योजना आणली आहे. मी अर्थसंकल्प सादर केला. आम्ही मिळून ही योजना तयार केली.’