मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना 10 वर्षाचा चिमुकला अचानक जमिनीवर कोसळला. मुलाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कानपूरमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत मुलगा इयत्ता सहावीत शिकत होता. मुलाच्या वडिलांचे आधीच निधन झाले असून तो आईसोबत मामाच्या घरी राहत होता.
आरिज असे मयत मुलाचे नाव आहे. तो सेंट जोसेफ शाळेत सहावीत शिकत होता. रविवारी शाळेला सुट्टी असल्याने आरिज मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. क्रिकेट खेळत असतानाच बॉलवरुन त्याचा मित्रासोबत वाद झाला. दोघांमध्ये मारामारीही झाली. यादरम्यान आरिज अचानक जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध झाला.
कुटुंबियांनी आरिजला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आरिजला कोणताही आजार नसल्याचे कुटुंबियांनी सांगितले. मात्र आरिजचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे कळू शकले नाही.