लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे आता राज्यातील सत्ता जाणार, याची जाणीव भाजपसह महायुतीला झाली आहे. आता सत्ता वाचवण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी तुम्ही चंद्र जरी मागितला तरी ते देण्याच्या तयारीत आहेत. लाडक्या खुर्चीसाठी आता ते वाटेल ते करायला तयार आहेत. लोकसभा निकालानंतर सत्ता जाणार, हे लक्षआत आल्याने आता त्यांच्यासाठी सर्व काही लाडके होऊ शकते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंता पालील यांनी महायुतीला टोला लगावला आहे.
महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे काम तुम्ही निवडून दिलेले महाविकास आघाडीचे शिलेदार करत आहेत. आज भाजपमध्ये राम राहिला नाही. तो राम पार्टी सोडून गेला आहे. जिथे जिथे रामाची देवळे आहेत. तिथे तिथे भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे नीतिमत्तेने वागले तर देव राहतो. मात्र अनितीचा पाठपुरावा सुरू केला, भ्रष्ट मार्गाने पुढे जायचा प्रयत्न केला. ती नीती तुम्हाला माफ करत नाही, असा हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.
शरद पवार साहेबांच्या एकदा डोक्यात बसलं की मग काय खरं नाही. त्यांच्याकडे जिद्द एवढी प्रचंड आहे की, वयाचा अडसर त्यांच्यासमोर येत नाही. त्यांनी एकदा मनात घेतलं की, तर ते पाट लावूनच सोडतात. त्यामुळे शहाण्या माणसाने त्यांना डिवचू नये, एकदा जागं केलं आणि आव्हान दिलं की पवार साहेब ते तडीस नेतात. असा 84 वर्षांचा योद्धा तुम्ही सर्वांनी हाताच्या फोडासारखा जपला. त्यामुळे तुम्हा बारामतीकरांचे महाराष्ट्रावर लाख मोलाचे उपकार आहेत, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.